धाराशिव | खडकाळ जमिनीत फुलवला नफ्यातील फळबागांचा मळा, सेंद्रिय शेतीमुळे जगदाळे कुटुंबाचा यशस्वी प्रयोग


हुरडा महोत्सवात घेतला अनेकांनी हुरड्याचा आस्वाद

 खडकाळ जमिनीवर शेती करणे कठीण असतानाही धाराशिव तालुक्यातील कौडगाव शिवारात विधिज्ञ जयंत शिवाजीराव जगदाळे आणि त्यांच्या पत्नी रेखा जयंत जगदाळे यांनी डोंगराळ भागात फळबाग फुलवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.त्यांनी आंबा,नारळ, चिकू, चिंच, जांभूळ आणि कागदी लिंबू यांची लागवड करून ओसाड माळरानाचे समृद्ध मळ्यात रूपांतर केले आहे.विशेष म्हणजे ही सर्व पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जात असल्यामुळे त्यांची शेती नफ्यात आली आहे.

जगदाळे कुटुंबाकडे ३० एकर वडिलोपार्जित शेती असून ती खडकाळ आणि कोरडवाहू आहे.यापूर्वी तूर,बाजरी, सोयाबीन,मूग व उडीद यांसारखी पारंपरिक पिके घेतली जात होती.मात्र उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे शेती तोट्यात जात होती.कोकणातील फळबाग शेती पाहून प्रेरित झालेल्या जयंत जगदाळे यांनी आपल्या शेतीत ठिबक सिंचनाचा वापर करून दहा एकर क्षेत्रावर फळबाग लागवड केली.सुरुवातीच्या टप्प्यात दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणी आल्या.मात्र, सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून, घागरीने झाडांना पाणी देत त्यांनी झाडे जगवली.या प्रयत्नांना यश मिळत गेल्याने गेल्या तीन वर्षांपासून फळांचा भरघोस उत्पादन मिळू लागले आहे.

त्यांच्या सेंद्रिय फळांना चांगली मागणी असून ग्राहक शेतात येऊन खरेदी करतात.तसेच ऑनलाइन मागणीसह घरपोच वितरणाची सुविधाही त्यांनी सुरू केली आहे.केशर आंब्याची चव विशेष गोडसर असल्याने त्याला चांगला दर मिळतो आहे.



त्याचबरोबर, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अंतर्गत एक एकर क्षेत्रावर शेडनेट उभारून जगदाळे दाम्पत्य सेंद्रिय पद्धतीने कारले,शिमला मिरची, दोडका,टोमॅटो आणि इतर भाजीपाला उत्पादन घेत आहेत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला अधिक पोषक आणि रुचकर असल्याने सर्व शेतकऱ्यांनी हीच शेतीपद्धती अवलंबावी, असे आवाहन रेखा जगदाळे यांनी केले.

*हुरडा महोत्सव : अनेकांनी घेतला आस्वाद*

आज अन्न व पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत हुरडा महोत्सवाचे आयोजन विधीज्ञ जयंत जगदाळे यांच्या कौंडगाव येथील अर्जुन फार्म हाऊसवर जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.या महोत्सवाच्या निमित्ताने अनेकांनी हुरड्याचा आस्वाद घेतला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,कृषी विभागासह अन्य विभागाचे अधिकारी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनी या महोत्सवात सहभागी होऊन हुरड्याचा आस्वाद घेतला.

*हुरड्याचे आरोग्यदायी फायदे* 
ज्वारीच्या कोवळ्या दाण्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते.ही सर्व पोषक तत्त्वे आणि लोह मिळून शरीराचे चयापचय सुधारण्याचे काम करतात.ज्वारीत अँटी ऑक्सिडंट्स आहे.उच्च पोषक मूल्य प्रथिने,तंतूमय घटक,लोह,मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.त्यामुळे शरीराच्या ऊर्जेची गरज पूर्ण होण्यास मदत होते. पचनसंस्थेसाठी उपयुक्त हुरड्यातील आहारातील तंतूमय घटक पचनसंस्था सुधारणा करण्यास मदत करतात. 


हृदयाच्या आरोग्य रक्तदाब नियंत्रित राहतो.त्यातील फायटोन्यूट्रिएंट्स आणि ऑटऑक्सिडंट्समुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.वजन कमी करण्यास मदत होते.ज्वारीतील उच्च फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.हाडे आणि दात बळकट करण्यासाठी हुरड्यातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे आणि दात बळकट होतात.रोगप्रतिकारक शक्ती वाढते हुरड्यातील असलेली जीवनसत्त्वे आणि अँटी ऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर हुरड्यातील अँटीऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे हुरड्यातील पोटॅशिअम आणि मॅग्नेशियममुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते.

Post a Comment

0 Comments