दसरा आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात दसरा मेळाव्याला विशेष परंपरा आहे. मात्र, यंदाचा दसरा मेळावा अत्यंत खास असणार आहे. यंदा तब्बल सहा दसरा मेळावे होणार आहेत. माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होईल. त्याचबरोबर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते.
याशिवाय राज्यात कोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा, नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. पण, यावर्षी आणखी एक दसरा मेळावा होणार आहे. म्हणजेच राज्यात यंदा वेगवेगळ्या ठिकाणी असे एकूण सहा दसरा मेळावे होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याची.
मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात प्रथमच मराठ्यांचा दसरा मेळावा होत आहे. यासाठी जय्यत तयार केली जात आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.
नारायण गडाच्या 900 एकर जागेवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे हा परिसर भगवामय झाला आहे. मेळाव्यासाठी येणाऱ्या बांधवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच, 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले असून ज्या सुविधा आयसीयु विभागात दिल्या जातात, त्याच सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत.
मेळाव्याच्या ठिकाणी विशेष व्यवस्था
मेळाव्याच्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, तब्बल 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था असणार आहे. या मेळाव्यासाठी आतापर्यंत नारायणगडावर जवळपास 500 क्विंटल बुंदीचे गाळप महाप्रसाद स्वरूपात करण्यात आले आहे. जेवणासह महाप्रसाद म्हणून बुंदी तयार केली जातेय. त्याचबरोबर गडाच्या परिसरात असणाऱ्या गावांमध्ये विशेष भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था टँकर आणि बाटल्यांमधून करण्यात आली आहे.
0 Comments