तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा पणाला, राहुल मोटे यांची अस्तित्वाची लढाई?


धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. एकतर महाविकास आघाडीकडे हा मतदारसंघ कुणाकडे जाणार?
याबद्दल उत्सुकता आहे. २००४ ते २०१४ अशा सलग तीन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते राहुल मोटे याठिकाणी निवडून येत होते. मात्र २०१९ साली शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी त्यांचा पराभव केला. राहुल मोटे हे शरद पवारांबरोबर राहिल्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघाची मागणी होऊ शकते. 

त्यातच तानाजी सावंत यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षालाही वादग्रस्त विधानांमुळे अंगावर घेतलेले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाकडून निवडणुकीत काय भूमिका घेतली जाते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

१९७८ साली निर्मिती झालेल्या या मतदारसंघात जनता पक्षाचे आनंदराव देशमुख निवडून आले. १९८० साली चंदनसिंह सद्दीवाल, तर १९८५ आणि १९९० साली महारुद्र मोटे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर १९९५ आणि १९९९ साली शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील आमदार झाले. २००४ ते २०१४ राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. जे २०१९ साली तानाजी सावंत यांनी मोडीत काढले. २०२२ साली शिवसेनेच्या बंडात एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या तानाजी सावंत यांना निवडून आणण्याचे आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर असणार आहे.

माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या आकस्मित निधनामुळे परंडा तालुक्यातील मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून तानाजी सावंत तर महाविकास आघाडीकडून राहुल मोटे यांचे नाव फायनल असली तरी ऐनवेळी एखादी दुसरे नाव समोर येऊन बंडखोरीचे आव्हानही दोन्ही पक्षाला असणार आहे.

Post a Comment

0 Comments