धाराशिवचे शिक्षण सम्राट सुधीर पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यासह खासदार ओमराजे निंबाळकर यांचे धाराशिव आणि कळंबमधील प्रत्येकी एक समर्थक देखील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. धाराशिवच्या या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते, ज्यामुळे धाराशिवच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
सुधीर पाटील हे पूर्वी शिवसेनेमध्येच होते. त्यांनी धाराशिव व तुळजापूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच 2009 साली निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून भूमिका निभावली होती. मात्र त्यानंतर सुधीर पाटील यांनी कमळ हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केला. मराठवाड्यामध्ये सुधीर पाटील यांची मोठी ताकद असून हजारो कार्यकर्ते व समर्थक आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. विधानसभेसाठी ते इच्छुक असल्याने आता शिंदे गट सुधीर पाटील यांना उमेदवारी देणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
धाराशिवमधील राजकारणात होणाऱ्या या बदलांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments