महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर पक्ष देखील राज्यातील उमेदवार निवडीचे काम जोमाने करणार असल्याचं दिसत आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी काळात साथ देण्याचं आवाहन शरद पवारांनी तासगाव-कवठेमहांकाळकरांना केलं आहे. शरद पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी तासगावमध्ये आर. आर पाटील यांच्या समाधीस्थळाचं देखील दर्शन घेतलं आहे.
आमदार सुमनताई यांच्यानंतर आता युवा नेतृत्व म्हून रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा व येणाऱ्या काळात तुम्ही रोहित पाटीलला ताकद द्या, आम्ही जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडवू असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगलीकरांना केलं आहे. रोहित पाटील यांनी नुकताच त्यांचा 25 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं आहे.
रोहित पाटील हे आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सर्वात रंगली होती, त्यानंतर आता शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत कवठेमहांकाळ येथील जनतेला दिले आहेत. शरद पवारांनी सांगली दौऱ्यावर असताना भाजपवर टीका केली आहे.
भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी काहीजणाच्या डोक्यात सत्ता गेली होती, मात्र डोक्यात गेलेली सत्ता उतरवायची असेल तर लोकांना सोबत घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण लोकसभेमध्ये दहा पैकी आठ जागा निवडून आणल्या आहेत. तर सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना संधी दिली आणि आता ते लोकसभेत जाऊन बसले आहेत अशी अप्रत्यक्षपणे टीका शरद पवारांनी केली आहे.
0 Comments