जालना |
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी आपल्या उपोषणाच्या प्रारंभी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे की, "महाराष्ट्रातील मराठा समाजाने शांत राहावे." त्यांनी स्पष्ट केले की, सरकारने सगे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हे उपोषण केले जात आहे. लाखो मराठा समाजाच्या मुलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि हैदराबाद संस्थानाचे गॅझेट त्वरित लागू करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
"हे आंदोलन सरकारला मोडीत काढण्यासाठी आहे," असे सांगून जरांगे पाटील यांनी सरकारला आणि सर्व आमदारांना इशारा दिला आहे की, "जर सरकारने मराठा आरक्षण मुद्दा मार्गी लावला नाही तर मी येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी उमेदवार उभे करेन."
मनोज जरांगे पाटील यांनी असेही सांगितले की, "मी आंदोलन करू नये म्हणून निवेदन देणारे कोण आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे." त्यांनी असा आरोप केला की, "पोलिस बंदोबस्त गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नसून आम्हाला धोपटायला लावण्यासाठी ठेवला आहे."
"मोदी साहेब शपथ घेणार आहेत. मी एक निवेदन पाठवणार आहे, तुम्ही शपथ घेऊ नका, मग ते घेणार नाही का?" असे सवाल त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला नवी दिशा मिळाली आहे.
0 Comments