मुंबई |
लोकसभा २०२४ चा निकाल समोर आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. यानंतर आता अनेक राजकीय उलथापालथ राज्यासह देशामध्ये होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, “अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत. ते पुन्हा एकदा शरद पवार साहेबांसोबत काम करण्यास इच्छूक आहेत.” असा दावा केला आहे.
“अजित पवार गटातील आमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे १८ ते १९ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत. तसेच, त्यांच्या गटातील इतर १२ आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेलच पण १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही? हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेणार आहेत. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना तसेच ज्यांना भाजपने मारून मुटकून अडचणीत आणून तिकडे घेऊन गेले, त्यांना प्राधान्य द्यावे. असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटते,” असे ते म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने ४ जागांवर निवडणूक लढवली. त्यामध्ये फक्त एकाच जागेवर यश आले इतर तीनही जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता. रायगडमधून फक्त सुनिल तटकरे यांचा विजय झाला. दुसरीकडे, बारामतीच्या जागेवर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात १० जागा लढवून ७ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे आता पुढे काय होत? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0 Comments