बार्शी |
तालुक्यातील कळंबवाडी (आ.) येथील सरपंच प्रभावती महादेव मुंढे, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव मुंढे, मंगल मुंडे, स्मिता विजय शिंदे, मिठू दिनकर एडके यांच्याविरुद्ध विकास भाऊ मुंढे, दशरथ जनार्दन मुंढे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे शासकीय जागेवर अतिक्रमण केले, अनाधिकृत बांधकाम केले म्हणून ग्रामपंचायत अपात्रता दावे दाखल केले होते.
सदर दाव्यात अनेक दिवसांपासून सुनावण्या सुरू होत्या. मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या सुनावण्याला अखेर पूर्णविराम मिळाला व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वरील पाचही सदस्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरवले आहे. त्यामुळे कळंबवाडी सह इतर गावातही ग्रामपंचायत सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.
बार्शी तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अतिक्रमण असून या निकालाने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अतिक्रमणास चाप बसणार असल्याचे मत कळंबवाडीचे माजी सरपंच पोपट पवार यांनी व्यक्त केले आहे.
एकाच वेळी पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाल्यामुळे कळंबवाडीची ग्रामपंचायत बरखास्त होणार असल्याचे निश्चित झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे कुटुंबीयातील व्यक्तींनी सरकारी जागेत अतिक्रमण करून वास्तव्य केले आहे व करत आहेत तसेच सदरच्या अतिक्रमण हे माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर यापूर्वीच्या प्रकरणात सिद्ध झाले आहे व गटविकास अधिकारी यांचा अहवाल ही याचिकाकर्त्याच्या बाजूने पोषक आहे, असा युक्तिवाद अर्जदारांच्या वतीने ऍड विकास जाधव यांनी मांडला होता. तो युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश पारित केले आहेत.
याचिका कर्त्याच्या वतीने ॲड विकास जाधव, ॲड अक्षय काशीद, ॲड प्रशांत घोडके, ॲड दत्तप्रसाद घोगरे यांनी काम पाहिले.
0 Comments