महामार्गावर विचित्र अपघात; एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारांचा गेला जीव



भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने दुचाकीस्वारांना उडवलं. अपघातानंतर बसचालकाने अचानक ब्रेक दाबला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या पीकअप वाहनाने बसला ठोकरलं. या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना कल्याण-नगर महामार्गावरील ओतूरजवळील कोळमाथा येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वारापैकी एक हिवरे (ता. जुन्नर) तर दुसरा घारगाव (ता. अकोले) येथील असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.अपघातात दुचाकीस्वारांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याहून प्रवाशांना घेऊन निघालेली बस आळेफाटा अहमदनगर मार्गे मेहकरला जात होती. बस नगर-कल्याण महामार्गावर कोळमाथा येथे सकाळी ११ वाजता आली.त्याचवेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने बसला जोरदार धडक दिली.

 अपघातानंतर बसचालकाने तात्काळ ब्रेक लावला. पण पाठीमागून आलेल्या पिकअपने बस ठोकरलं. अपघातानंतर पिकअपही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. याप्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments