बार्शी निर्भया प्रकरण ; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पीडित कुटुंबाशी थेट संवाद साधला


बार्शी |

बार्शी निर्भया पीडित विद्यार्थीनीची राष्ट्रवादी नेत्या विद्या लोलगे यांनी भेट घेतली. पीडित मुलीने बारावीचे दोन पेपर राहिले याची खंत व्यक्त केली. मला नेव्हीत भरती व्हायचे होते, ते स्वप्न अपूर्ण राहिले,या नराधमांनी माझे तीन बोटे तोडले असे सांगत खंत व्यक्त केली. 6 मार्च भरापासून पीडित मुलीवर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून पीडित मुलीला वाचवले आहे. शुक्रवारी सायंकाळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाशी थेट संवाद साधला आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून पीडित कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

5 मार्च रोजी रात्री बार्शीत मोठी घटना घडली होती. बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीवर अत्याचार करण्यात आला होता. पीडितेने पोलीस तक्रार केली होती. याचा राग मनात धरून त्या विद्यार्थीनीवर संशयित आरोपींनी दुसऱ्या दिवशो कोयत्याने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बार्शी पोलिसांनी ताबडतोब अक्षय विनायक माने व नामदेव सिद्धेश्वर दळवी या दोन नराधमांना अटक केली होती. या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे डीआयजीनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चार पोलिसांना सस्पेंड केले आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडित विद्यार्थीनीची तब्येत जाणून घेतली. विद्या लोलगे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना कॉल करून पीडित कुटुंबाला संरक्षणाची मागणी केली. रुपाली चाकणकर यांनी पीडित विद्यार्थीनीच्या आईसोबत बोलून धीर दिला, महिला आयोग आपल्या सोबत आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून संरक्षणासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments