एम.ए संपवून मी शिवाजी विद्यापीठातच पत्रकारितेच्या कोर्सला प्रवेश घेतलेला. वर्ग सुरु झाले होते. दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच भरल्या वर्गात एक व्यक्तिमत्व अवतरलं. अंगावर साधा ड्रेस, साधी चप्पल, वरुन मस्त स्लीव्हलेस स्वेटर, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा अन् हातात भली मोठी डायरी घेवून कुणाकडे ही न पाहता त्यांनी खिडकी शेजारचा बाक गाठला. अनुभवी पत्रकार असावा अन् आता डिग्री घेण्यासाठी याने प्रवेश घेतला असावा असा मी मनात कयास बांधला. पण या व्यक्तिमत्वाच्या आत खुपसं दडलं होतं. ढासुन भरलेली अस्वस्थता, कोलमडलेपण, वेळोवेळी अपयशाने आलेलं नैराश्य, जगण्याच्या, घडण्याच्या विस्कटलेल्या दाही दिशा. असे अनेक पदर या व्यक्तिमत्वाचे पुढे उलगडत गेले. अर्जुन उर्फ नाना गोडगे असं या व्यक्तिमत्वाचं नाव.
माझ्या बार्शी तालुक्या लगतच नानाचं सिरसाव - वाकडी हे मराठवाड्याच्या हद्दीत येणारं छोटसं गाव. नाना वयानं मला जेष्ठ, अगदी अनुभवांनी ही चार पावसाळे नानांनी जास्तच पाहिलेले. घरची परिस्थिती बेताची. डी.एड करुन नोकरी नाही. पुण्यात वॉचमन म्हणून नानांनी नोकरी पत्करली. सोबत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला. यश थोडक्यात हुलकावणी देत होतं. पुण्यात मन रमेना, खर्च ही झेपेना. शेवटी नानांनी कोल्हापूर गाठलं. रुम वर राहून विद्यापीठाच्या अभ्यासिकेत अभ्यास सुरु ठेवला. एकामागे एक परिक्षा देणं सुरु होतं. यश काही सापडत नव्हतं. वय वाढत होतं. घरुन काळजी वाढत होता. लिहिण्या, वाचण्याची आवड असल्याने नानांनी पत्रकारितेला प्रवेश घेण्याचं ठरवलं. कोर्स सुरु झाला. विद्यापीठातल्या होस्टेलवर आम्ही एकत्रच. एकमेकांची सुख, दुःख शेअर होत होती. होस्टेल हाच हक्काचा निवारा होता. आमचं वाचन, लेखन सुरु होतं. आम्ही लिहिलेलं कुठे कुठे छापुन ही येत होतं. नाना त्यांच्या लिखानाची कॉपी आधी मला दाखवत असे. ते जेष्ठ असले तरी तो भाव त्याच्यात नव्हता अन् आज ही नाही.
कधी ओ 'भई' तर कधी 'मतीन भाई' अशी नानांची आपुलकीची हाक होती. सकाळच्या चहा, नाष्ट्याची सवय खरी मला नानांची लावली. नानांनी कायम माझ्याकडे सल्ला विचारला तर मी माझी अस्वस्थता कायम नानांशी शेअर केली. तो काळच खरा अस्वस्थ होता आमच्यासाठी. आमच्या बोलण्यात कायम गाव असायचा, माणसं असायची. आम्ही ऐकमेकांनाच आधार देत असु. दोन वर्षाचा कोर्स संपत आला. आता पुढे काय ? हा मोठा प्रश्न होता. मी दै.सकाळ मध्ये जॉईन झालो. नाना ही कोल्हापुरातच एका आमदारांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करु लागले. दोघांच्या हाताला काम मिळालं होतं. पगार थोडका का असेना पण गाडी रुळाला लागली होती. आसरा विद्यापीठातच्या होस्टेलवरच होता. सोबत राहणं, नोकरी करणं इकडे, तिकडे फिरणं सुरु होतं. अचानक कोरोना आला. होस्टेल सोडलं अन् आमची फाटाफूट झाली.
आम्ही कोल्हापूर सोडून गाव गाठलं. दोघांनी ही काही दिवस वर्क फ्रॉम होम केलं. कोरोना महामारीच्या स्फोटातच नानांच्या लग्नाचा बार उडाला. मुशाफिरी करत भटकणाऱ्या नानांच्या गाडीला ब्रेक लागला. जबाबदारी वाढली होती. नानांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला. इकडेच नवं काम करण्याची उमेद नानांची होती. स्वतःचं न्यूज वेब पोर्टल सुरु करण्याचा मनोदय नानांनी व्यक्त केला. मी तात्काळ त्याला अनुमोदन दिलं. अनेक अडचणीतून पोर्टल उभं राहिलं. एखादं काम हाती घेतलं तर ते पुर्ण झाल्या शिवाय सोडायचं नाही हा नानांचा मुळ पिंड. मोठ्या कष्टाने 'लोकवार्ता' नावाचं वेब पोर्टल नानांनी अवघ्या काही दिवसात नावारुपाला आणलं. बार्शीसह परांडा तालुक्यात लोकवार्ताचा वाचक वाढला. हळुहळू उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात नानांनी 'लोकवार्ता' पोहोचवलं. पुढे मी मात्र कोल्हापुरला परतलो. पण नानांशी संपर्क कायम होता. वेब पोर्टलच्या स्ट्रॅटेजी बद्दल कामय बोलणं व्हायचं. नानांचा एका वॉचमन पासून सुरु झालेला प्रवास पत्रकार, संपादका पर्यंत पोहचला. त्यांच हे यश थोर आहे.
नानांच्या मनमिळाऊ व रोखठोक स्वभावामुळे अनेकांनी नानांना मदतीचे हात दिले. अडचणीच्या काळात आपल्याला मदत केलेल्यांना कधी ही विसरायचं नाही हे नानाचं कायम म्हणणं राहिलं. हसत हसत टोमणे मारण्याची नानांची खरी खोड पण त्यांनी कधी कोणा बद्दल द्वेष भाव मनात जपला नाही. व्यवहार अन् भावना यांना एकत्रित होवू द्यायच्या नाही हे नानांचं सुत्रं. आलेल्या संकटाला तोंड देणं, चिकाटीनं, सातत्याने काम करत राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य. आपणं भलं अन् आपलं काम भलं हा मार्ग निवडत नाना अर्थात संपादक अर्जुन गोडगे आज नावारुपाला आलेलं व्यक्तिमत्व.
आज नानांचा वाढदिवस, त्याच्या यशाचे, आनंदी आयुष्याचे इमले असेच वर चढत जावो याच यानिमित्ताने त्यांना सदिच्छा... चांगभलं..
0 Comments