मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असताना, राजधानीत महिला अत्याचाराची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात एका आध्यात्मिक बाबाने एका महिलेवर अत्याचार केला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेनं काही दिवसांपूर्वी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपीला गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत.
गौतम गिरी घनश्याम गिरी गोसाई असं अटक केलेल्या २६ वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपी गौतम गिरी याने काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका महिलेला विविध प्रकारचे आमिष दाखवून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं होतं. याप्रकरणी पीडितेनं गुन्हा दाखल केल्यानंतर, एका बाबाला पोलिसांनी अटक केली होती. पण आरोपी गौतम गिरी फरार होता.
याप्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी गौतम गिरी घनश्याम गिरी गोसाई या आध्यात्मिक बाबाला गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी ही कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने आरोपीला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कांदिवली पोलीस आरोपीची सध्या कसून चौकशी करत असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे.
दुसऱ्या एका घटनेत , पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने लग्नाचं आमिष दाखवून कोथरूडमधील २५ वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीनं पहिलं लग्न झाल्याची माहिती लपवून ठेवत तरुणीची फसवणूक केली आहे. यानंतर पीडितेनं लग्नासाठी विचारलं असता, आरोपीनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच ‘तुझे तुकडे तुकडे करून जीवे मारेन, आपलं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही’ अशी धमकी देखील आरोपीनं दिली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments