मूल होत नसल्याच्या कारणावरून आपल्या पत्नीला आपल्या नातेवाईकासोबत शारीरिक संबध ठेवण्यास भाग पाडण्याची घटना पाथर्डी तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीसह त्याच्या नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणला राहणाऱया पीडितेचा विवाह एक वर्षापूर्वी पाथर्डी तालुक्यातील एका तरुणाशी झाला होता. विवाह झाल्यानंतर काही महिने दोघांचाही संसार सुखाचा चालू होता. मात्र, नंतर दोघांत वाद होऊन ही महिला आपल्या माहेरी गेली. मागील महिन्यात ती आपल्या सासरच्या गावी राहात असलेल्या आपल्या आजोबांकडे आली होती. १५ दिवसांपूर्वी तिचा पती तिच्याकडे आला व त्याने ‘येथून पुढे मी तुझ्याशी वाद घालणार नाही. तू परत सासरला नांदावयास चल’, असे सांगून तिला घेऊन गेला. बुधवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास तिचा पती आपल्या एका नातेवाईक युवकाला घेऊन आला. त्याने आपली पत्नी झोपलेल्या खोलीची आतून कडी लावली. त्यानंतर ‘आपल्याला मूल हवे आहे. त्यामुळे तू माझ्या नातेवाईकासोबत संबंध ठेव,’ असे म्हटला. या निर्णयाला विवाहितेने नकार देताच तिच्या पतीने बळजबरीने तिला दोन गोळ्या खायला लावल्या. यामुळे विवाहितेला चक्कर आली. यानंतर त्या नातेवाईकाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीनेही अत्याचार केला.
हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. दुसऱया दिवशीही असाच प्रकार घडला. तिसऱया दिवशी दुपारी पती घरी नसताना ही विवाहिता आपल्या शेजारी राहणाऱया महिलेकडे गेली व तिच्या मोबाईलवरून हा सर्व प्रकार आपल्या माहेरच्या लोकांना सांगितला. त्यानंतर ही महिला व तिच्या मामाने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पतीसह त्या नातेवाईकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
0 Comments