शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचे समन्स


 भावना गवळी  यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. भावना गवळींच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक झाल्यावर आता भावना गवळींना ईडीकडून समन्स आले आहे. त्यानुसार आता भावना गवळी यांना येत्या ४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संबंधित असणाऱ्या ९ ठिकाणांवर ED ने छापेमारी केल्यानंतर, परभणी येथील पाथरी याठिकाणी ED ने मंगळवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी EDच्या अधिकाऱ्यांनी भावना गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना अटक केली आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे.

सईद खान हे संबंधित कंपनीचे संचालक आहेत. ईडीने परभणी जिल्ह्यातील पाथरी याठिकाणी छापेमारी केली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सईद खान यांना अटक केली असून ते भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचा कारभार पाहात होते. हरीश सारडा यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? १९९२ मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्डाची पणन संचालकाकडे नोंद करून कारखान्याची स्थापना केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमने बालाजी पार्टीकल बोर्डला ४३ कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. २००० सालापर्यंत हा कारखाना फक्त नावाला उभा होता. सुरू मात्र झाला नव्हता.

२००१ मध्ये भावना गवळी या कारखान्याच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर २००२ मध्ये भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची १४ हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने आपलीच दुसरी संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. विशेष म्हणजे हा व्यवहार करण्यासाठी गवळी यांनी शासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यानंतर २००७ मध्ये राज्य शासनाने बालाजी पार्टीकल बोर्डला विकण्याची परवानगी दिली.

तसेच भावना गवळी यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. हा कारखाना विकण्यासाठी जिल्हा उप निबंधकांने काही अटी शर्ती लावल्या होत्या. यानंतर २०१० मध्ये बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना भावना गवळी यांचे पीए अशोक गांडोळी यांचे ९० टक्के शेअर असलेल्या भावना ऍग्रो प्रायव्हेट लिमीटेडला विकण्यात आला. यासाठी रिसोड अर्बन क्रेडिट कॉ. बँकची १० कोटीची बँक गॅरंटी घेत शासनाची परवानगी न घेता विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याच व्यवहारात मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप हरीश सारडा यांनी ईडीकडे केला आहे. त्यानंतर ईडीने आज ही कारवाई करत भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचे व्यवहार सांभाळणाऱ्या सईद खान यांना अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments