‘सध्याचे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. पुढचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असेल,’ असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी व्यक्त केला. त्याचवेळी पुणे मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत मुंबईनंतर बाळासाहेब ठाकरे यांचे या पुण्यावर प्रेम होते. येथे त्यांचे वास्तव्यही असायचे. त्या पुण्यात शिवसेनेची सत्ता आणणार का नाही, असा सवाल राऊत यांनी केला. छाती पुढे काढून ‘ठोकरे’ सरकार आहे, याची जाण शिवसैनिकांनी ठेवून आपला बाणा कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने शिवसेनेनेच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, विजय शिवतारे, संपर्कप्रमूख सचिन आहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, उपनेते रवींद्र मिर्लेकर, कीर्ती फाटक यांच्यासह आजी-माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी भोसरी येथील मेळाव्यात ‘अजित पवार यांनी शिवसैनिकांचे ऐकले नाही, तर गडबड होईल,’ असा इशारा राऊत यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ते पुण्यात काय बोलतात, याविषयी उत्सुकता होती. राऊत म्हणाले, ‘पुणे मनपा आणि विधानसभेत संघटनेचे काम वाढत राहिले पाहिजे.
आपल्याला जिंकण्याची नशा पाहिजे, त्यावेळी पक्ष पुढे जाईल. पुणे महापालिकेवरही शिवसेनेचा भगवा पडकविणे ही काळाची गरज आहे. तसेच शिवसेना शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडत नाही, असे सांगत, युती, आघाडी, आघाड्यांमध्ये भांड्याला-भांडे लागते. ते नको असेल तर आपल्याला विधानसभेत जास्तीतजास्त जागा निवडून आणल्या पाहिजेत.’
‘गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, तर महाराष्ट्राचा का नाही? छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या राज्यात उद्धव ठाकरे राज्याचे नेतृत्व करत आहेत.
त्यामुळे ते दिल्ली पाहायला गेले, भविष्यात आम्ही दिल्लीवर राज्य करणार असून, मी बोलतो ते करून दाखवतो. दिल्लीला मुख्यमंत्री गेले हे समजताच अनेकांनी देव पाण्यात ठेवले. परंतु, ते शासकीय कामासाठी गेले होते’ अस राऊत म्हणाले.
0 Comments