विराटनंतर टी-२० संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाची चर्चा, मग केएल राहुल ट्विटरवर ट्रेंड का?


 विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -२० विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, टी -२० विश्वचषकानंतर यापुढे तो टी -२० संघाचा कर्णधार राहणार नाही. टी -२० संघाचा कर्णधार म्हणून त्याची ही शेवटची स्पर्धा असेल. तथापि, तो टी -२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळत राहील. 
(Advertise)

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही तो कर्णधार राहील. कोहलीने कर्णधारपद सोडल्याच्या बातम्या अलीकडेच समोर आल्या होत्या. यामध्ये असे म्हटले होते की कोहली टी -२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडेल. पण बीसीसीआयने लगेच हे वृत्त फेटाळले. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ दोघांनीही सांगितले होते की, कर्णधारपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. जोपर्यंत संघ चांगली कामगिरी करत आहे तोपर्यंत असे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४५ टी -२० सामने खेळले आहेत आणि त्यातील २९ सामने जिंकले आहेत. केवळ १३ सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयाची टक्केवारी ६५.११ इतकी आहे. २०१७ च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो टी – २० संघाचा कर्णधार बनला. तसेच, २०२१ टी २० विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून पहिली आयसीसी टी-२० स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर कोहली कर्णधारपदावरून पायउतार होईल. दरम्यान, विराट कोहलीनंतर भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद आक्रमक फलंदाज रोहित शर्माकडे सोपवलं जाईल, अशी चर्चा आहे. तसेच सोशल मीडियावर आणखी एका नावाची चर्चा आहे, ते नाव म्हणजे के. एल. राहुल.
(Advertise)

लोकेश राहुलच्या नावाची चर्चा का?

मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा भारतीय भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे विराट कोहली टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर कर्णधारपद रोहित शर्माकडेच सोपवलं जाईल, यात शंका नाही. मात्र रोहितसोबत सोशल मीडियावर लोकेश राहुलच्या नावाचीदेखील चर्चा आहे. राहुल टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी खेळाडू राहिला आहे. तसेच आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करत आहे. तसेच राहुलकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जातं. रोहित-विराट हे दोन्ही खेळाडू ५-६ वर्षांनी क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतात. त्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्व कोण करेल, याबाबत आत्ताच विचार केला जात आहे. त्यामुळे टी-२० संघाचा कर्णधार म्हणून के. एल. राहुल, रिषभ पंत किंवा श्रेयस अय्यर यांच्या नावांचा विचार करायला हवा, असे मत काही क्रिकेटप्रेमींचे आहे.
(Advertise)

राहुलने आतापर्यंत ४९ टी-२० सामन्यांमध्ये भारताचा प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात त्याने ३९.९ च्या सरासरीने आणि १४२.२ च्या स्ट्राईक रेटने १५५७ धावा चोपल्या आहेत. त्यात २ शतकं आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्येदेखील त्याने उत्तम कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये त्याने ८८ सामन्यांमध्ये ४६.५ च्या सरासरीने आणि  १३५.८ च्या स्ट्राईक रेटने २९७८ धावा चोपल्या आहेत. त्यात २ शतकं आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments