आईचं काळीज.....

 
दारावरची बेल वाजली. त्याने घड्याळात बघितले, तर रात्रीचे अकरा वाजले होते. दोघांनीही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. कोण असेल इतक्या रात्री?  

त्याने दरवाजा उघडला, तर अवाक होऊन तो बघतच राहिला. त्याच्या पत्नीने आवाज दिला, कोण आहे हो? दरवाज्यात उभ्या असलेल्या आपल्या आईकडे बघत तो म्हणाला, "आई तू इथे, आणि इतक्या रात्री?" आणि त्याने आईला आत घेतले. 

आईला बघून त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर बारा वाजले. मस्तकावर आढ्या चढवत ती म्हणाली, "इथे कशाला आलात तुम्ही आमचं टेन्शन वाढवायला. इथे काय आमचे प्रॉब्लेम्स कमी आहेत. त्यात पुन्हा भर टाकायला आलात." 

तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ती फणफण करत आत मध्ये निघून गेली. आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्याला खूप वाईट वाटले. परंतु पत्नीच्या स्वभावाला तोच काय त्याचे घरचे सगळेच कंटाळले होते. त्यामुळेच त्याचे आईबाबा पण जास्त त्याच्याकडे येत नव्हते. आणि त्याला पण ती गावाकडे जास्त जाऊ देत नव्हती. फोन वर बोलणे व्हायचे तितकेच. 

त्याने आईला सोफ्यावर बसविले. आणि तिच्यासाठी प्यायला पाणी घेऊन आला. आणि म्हणाला, "आई तू इतक्या रात्री आणि एकटीच कशी काय आली? आणि तुझी तब्येत जास्त खराब आहे, असा बाबांचा दुपारीच मला फोन आला होता. मी उद्याला येणारच होतो गावाला." 

त्यावर आई म्हणाली, "बाळा मी तुझी खूप वाट बघितली रे. मला तुझी खूप आठवण येत होती. मी तुझ्या बाबांना रोज विचारायची तर ते म्हणत होते कि, मी फोन केला होता परंतु तो कामा मध्ये जास्तच व्यस्त आहे म्हणून. 

तो ओशाळला आणि त्याने नजर फिरवली. त्याच्या बाबांचा ८ दिवसांपासून सतत त्याला फोन येत होता. आणि फोनवर ते सांगत होते कि, "आईची तब्येत जास्त आहे. तू येऊन तिला भेटून जा." परंतु त्याची पत्नी त्याच्या गावाला जाण्यावरून वाद घालत होती, त्यामुळे इच्छा असूनही तो जाऊ शकला नव्हता. 

त्याला अपराध्यासारखे वाटले. म्हणूनच त्याची आईच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत झाली नाही. तो चाचरत आईला म्हणाला, "आई तुझी तब्येत?" त्यावर आई म्हणाली, "बाळा आता मी एकदम ठीक आहे. आता मी सर्व रोगांतून मुक्त झाले आहे. म्हणूनच तर तुला भेटायला आली, आता वर्ष होत आले रे तुला बघितले नाही."

"आणि तू पण आम्हाला भेटायला नाही आलास बाळा. आई बाबांपेक्षाही महत्वाचे असे कोणते काम असते रे? बरं जाऊ दे, तुला भेटले आणि आता माझे मन शांत झाले बघ."

तितक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. फोन टेबलवर चार्जिंगला होता. त्याने फोन चार्जिंग वरून काढून कानाला लावला. समोरून रडत रडत आवाज आला, "राहुल बेटा, तुझी आई आपल्याला सोडून कायमची निघून गेली रे." 

"काय?" त्याला धक्काच बसला. "बाबा हे काय बोलताय तुम्ही." तोवर फोन कट झाला. त्याने मागे बघितले तर सोफ्यावर आई त्याला दिसलीच नाही.  त्याने इकडे तिकडे संपूर्ण घरात आईचा शोध घेतला, पण आई त्याला कुठेच दिसली नाही. 

आता त्याला दरदरून घाम फुटला होता, त्याचे अंग थरथरायला लागले होते. आता सर्वकाही त्याच्या लक्षात आले होते. त्याने दोन्ही हात डोक्यावर मारत जोरात हंबरडा फोडला "आई". 

त्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी धावत हॉल मध्ये आली. तो जमिनीवर पडला होता आणि जोरजोराने रडत होता. तिने इकडे तिकडे नजर फिरवली तर त्याची आई तिला कुठेच दिसली नाही, ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, "काय झाले तुम्हाला, का रडत आहात तुम्ही?" 

त्याने रागानेच तिच्याकडे बघितले आणि एक जोराचा धक्का दिला. ती बाजूला जाऊन पडली, तो तिला म्हणाला, "तुझ्यामुळे.. फक्त तुझ्यामुळे.. एका आईला आपल्या मुलासाठी मरेपर्यंत झुरावं लागलं. अगं तू पण एक स्त्री आहेस, एका मुलाची आई आहेस, मग तुला दुसऱ्या आईचं काळीज कसं ओळखता आलं नाही." 

आणि हात जोडून वर बघत तो म्हणाला, "आई.. आई.. मला माफ कर गं.. मी तुझा अपराधी आहे".  

आयुष्यात सगळी नाती पुन्हा मिळतील, पण आई बाप एकदाच मिळतात. ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य केवळ तुमच्या सुखाकरिता खर्ची घातलं.

ते फक्त तुमच्या आयुष्यातील काही क्षण तुम्हाला मागतात. जरूर विचार करा !

अनामिक - (सोशल मीडियावरुन साभार)

Post a Comment

0 Comments