गृहिणीच्या घरातील कामाचं मूल्य पतीच्या कार्यालयीन कामापेक्षा तसूभरही कमी नाही : सुप्रीम कोर्ट


कार्यालयीन काम करणाऱ्या पतीच्या तुलनेत गृहिणीने घरात केलेल्या कामाचं मूल्य तसूभरही कमी नाही, असा निर्वाळा देत सुप्रीम कोर्टाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मंगळवारी वाढ केली. दिल्लीत एप्रिल २०१४ मध्ये कारच्या धडकेत दुचाकीस्वार जोडप्याचा मृत्यू झाला होता. 

 जस्टीस एन वी रामणा आणि सूर्य कांत यांच्या खंडपीठाने दाम्पत्याच्या नातेवाईकांना मिळणारी नुकसान भरपाई ११.२०  लाखांवरुन थेट ३३.२० लाखांवर नेली. मे २०१४ पासून वार्षिक ९ टक्के व्याजदराने संबंधित इन्शुरन्स कंपनीला मयत व्यक्तीच्या वडिलांना ही रक्कम द्यायची आहे.

महिलांची दिवसातील २९९ मिनिटं घरगुती कामात

२०११ च्या जनगणनेनुसार जवळपास १५ कोटी ८० लाख ८५ हजार महिलांनी आपल्या मुख्य व्यवसायात घरगुती काम (household work) असे लिहिले आहे. त्या तुलनेत केवळ ५७  लाख पुरुष घरगुती कामकाज करतात. भारतातील वेळेचे नियोजन या २०१९  मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला त्यांनी दिला. 

त्यानुसार महिलावर्ग दिवसाची सरासरी २९९ मिनिटं (अंदाजे पाच तास) विनामानधन घरगुती कामकाजावर व्यतीत करतात. तर पुरुष केवळ ९७ मिनिटं  घरगुती कामकाजात घालवतात.

विनामानधन सेवा-सुश्रुषेत १३४ मिनिटं

 दुसरीकडे, महिलावर्ग दिवसाची सरासरी १३४ मिनिटं (सव्वादोन तास) घरातील सदस्यांची विनामानधन सेवा-सुश्रुषा करण्यात घालवतात.  तर पुरुष या कामासाठी केवळ ७६ (सव्वा तास) देतात. 
 एकंदरीत विचार करता, महिला दिवसातील सरासरी १६.९  टक्के विनामानधन घरगुती कामांमध्ये घालवतात.  तर पुरुष केवळ आपला २.६ टक्के वेळ देतात, याकडे जस्टीस एन वी रामणा यांनी लक्ष वेधले.


Post a Comment

0 Comments