वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी मनसेचा आजरा वनविभागावर मोर्चा व शंखध्वनी आंदोलन


राकेश करमळकर/आजरा :

आजरा तालुक्यात गेले अनेक वर्षे हत्ती व गवा या वन्यप्राण्यांचा त्रास सुरु आहे. हत्ती व गव्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातून शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आजरा वनविभागावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शंखध्वनी आंदोलन देखील करण्यात आले. याबाबतचे निवेदन परिक्षेत्र वनाधिकारी यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपजिल्हाध्यक्ष प्रताप पाटील व आजरा तालुकाध्यक्ष अनिल निऊंगरे यांनी केले. यावेळी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मनसेने टाळेठोक आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. पण सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी मध्यस्थी केल्याने त्यांनी टाळेटोक आंदोलन मागे घेत शंखध्वनी आंदोलन केले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वन्यप्राण्यांकडून नुकसान झालेल्या पिकांना अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई मिळते. यातून शेतकर्‍यांची फसवणूकच होते. यामुळे शासनाच्या हमीभावाएवढी रक्कम शेतकर्‍यांना मिळावी. वनविभागाच्या वतीने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. जेणेकरून शेतपिकाचे नुकसान टाळता येईल. तसेच नुकसान भरपाई देखील द्यावी लागणार नाही. त्याचबरोबर आजरा तालुक्यातील संभाव्य हत्ती संगोपन केंद्रांबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रयत्न व्हावेत. या वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास तालुक्यातील शेतकरी शेती करणे बंद करील. हे धोक्याचे आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. मोर्च्यावेळी नागेश चौगुले, प्रताप पाटील, उपतालुकाध्यक्ष आनंदा घंटे यांनी अधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रभारी वनाधिकारी डी. बी. काटकर यांनी लवकर वन्यप्राण्यांच्या प्रश्नी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. 

आंदोलनात आजरा उपशहराध्यक्ष इक्बाल हिंग्लजकर, चंद्रकांत सांबरेकर, वसंत घाटगे, संतोष चौगुले, प्रवीण बेळगावकर, सुरेश मगदूम यांच्यासह मनसेसैनिक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments