धाराशिव | बर्ड फ्लू पार्श्वभूमी : आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन


धाराशिव |

देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू (H5N1) विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. जिल्ह्यातील ढोकी परिसरात अचानक कावळ्यांचे मृत्यू आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.या घटनेनंतर जिल्हास्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने या भागाची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

बर्ड फ्लू हा विषाणूजन्य रोग असून तो प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये पसरतो.परंतु,काही प्रकरणांमध्ये हा माणसांनाही बाधित करू शकतो.या आजाराची प्राथमिक लक्षणे ताप,सर्दी,खोकला,श्वास घेण्यास अडचण, गळा दुखणे,स्नायूंमध्ये वेदना इत्यादी स्वरूपात दिसतात.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता खालील खबरदारी उपायांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळावे.मृत पक्षी आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे.पक्ष्यांच्या संपर्कानंतर हात स्वच्छ धुवावे. कोंबडीचे मांस व अंडी पूर्णपणे शिजवूनच खावे.

लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.बर्ड फ्लूबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. ढोकी परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे.बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुढील उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

ढोकी गाव व आजूबाजूच्या १० किमी परिसराला 'अलर्ट झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे.आरोग्य विभागाकडून फ्लू सदृश्य आजारांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.० ते ३ किमी परिसर 'इन्फेक्टेड झोन' म्हणून घोषित करून दैनंदिन गृहभेटीद्वारे सर्वेक्षण सुरू आहे.

आरोग्य व पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.बाधित क्षेत्राचे निर्जंतुकीकरण ग्राम पंचायतमार्फत करण्यात येत आहे.नागरिकांनी घाबरू नये,प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहून खबरदारी घ्यावी,तसेच प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments