रश्मी ठाकरे होणार राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?, चर्चेला उधाण


 लोकसभा निवडणुकानंतर लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. मनसे, उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट, शरद पवार गट यासह इतरही अनेक पक्ष हे आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. तर, महायुतीला म्हणावी तशी छाप पाडता आली नाही. लोकसभेच्या निकालानंतर मविआ नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दुसरीकडे लोकसभेतील अपयशामुळे महायुतीमधील अनेक नेत्यांची घरवापसी सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या अजित दादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सत्तेवर आहेत. मात्र, जगावाटपवरुन महायुतीत असलेले मतभेद बऱ्याचदा समोर आले आहेत.

त्यातच विधानसभा तोंडावर असताना महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून देखील वेगवेगळे मत दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादाचे नाव पुढे करत आहेत. तर, भाजपकडून फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, असा उच्चार केला जातोय. तसेच एकनाथ शिंदे गटाकडूनही शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा दावा केला जातोय. या चर्चेत आता अजून एक नाव जुडलं आहे.

रश्मी ठाकरे असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सध्या चर्चेत आल्या आहेत. राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रश्मी ठाकरे यांचं नाव असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वीच कॉँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांना याबाबत बोलूनही दाखवलं आहे. त्यांना महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? असा प्रश्न करण्यात आला होता.

या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण विधान केलं. “सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात.”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. रश्मी ठाकरे यांनी कधीही राजकारणात रस घेतला नाही. त्या नेहमी त्यांच्या पतीबरोबर असतात याचा अर्थ असा होत नाही की, त्या राजकारणात सक्रीय आहेत. राज्याला महिला मुख्यमंत्री मिळायला पाहिजे. पण, कारण नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव त्यात नसावं.”,असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या होत्या?
“महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाल्या तर मला आनंदच होईल. सगळ्या पक्षांकडे चेहरे असतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे रश्मी ठाकरे आहेत. तर काँग्रेसमध्येही चेहरे आहेत. महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाच्या महिला नेत्याला मुख्यमंत्रिपद मिळालं तर मला आनंदच होईल. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींना काम करताना आम्ही पाहिलंय.”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.

वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री पदाच्या चेहरा असणार काय?, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुतीने अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, याबाबत काहीच स्पष्ट केले नाही. तसेच महाविकास आघाडीने देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, हे आगामी काळातच दिसून येईल.

Post a Comment

0 Comments