फडवणीस शिवरायांचे दुश्मन…; मनोज जरांगे नेमके काय म्हणाले



 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संतापाचे वातावरण पसरले आहे. तसेच लाखो शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. अशातच आता या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी देखील या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

महाराजांचा पुतळा बनवणाऱ्याला जेलमध्ये टाका : मनोज जरांगे
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेचा निषेध करत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत दुदैवी गोष्ट आहे. कारण या घटनेचे दूरगामी परिणाम सरकारवर होऊ शकतात. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं दुश्मन म्हटलं जात आहे.

मात्र या घटनेत आम्हाला राजकारण करायचं नाही. कारण देवेंद्र फडवणीस हे शिवरायांचे दुष्मन आहेत, असे आम्ही म्हणणार नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करून तो पुतळा बनवणाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. अन्यथा या घटनेचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असं देखील मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे म्हणाले आहेत.

 स्मारक पडल्यामुळे महाराजांचा मोठा अवमान झाला :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने कित्येक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच स्मारक पडले हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अवमान आहे. ज्यांची या घटनेत चूक आहे, त्यांच्यावर अशी कारवाई व्हायला पाहिजे की त्याला कधीही जेलमधून सोडू नये. तसेच महाराजांच्या पुतळ्याचं काम करणाऱ्याला देखील मोठी शिक्षा व्हायला हवी असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे म्हणाले आहेत.

या घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. जयदीप आपटे हा कल्याणचा रहिवासी असून तो सध्या फरार आहे. त्याच्या घराला कुलूप आहे. त्यामुळे जयदीप आपटेचा तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments