अमित शाह यांच्या टीकेला मनोज जरांगे-पाटील यांचे उत्तर: "कधीपर्यंत तेच पाढे गिरवणार?"


गृहमंत्री अमित शाह यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या सरकारवर टीका करताना, "जेव्हा भाजपचं सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षण मिळते. आणि शरद पवारांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण का जाते?" असा सवाल केला होता. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटलांनी विचारलं, "कधीपर्यंत अमित शाह तेच-तेच पाढे गिरवणार आहेत? भाजपचे सरकार तीन वर्षांपासून आहे. भाजप सरकारनं का आरक्षण दिलं नाही? वरून महिलांवरती गोळ्या झाडल्या, गुन्हे दाखल केले. महाविकास आघाडीनं मराठा आरक्षण घालवलं, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, अमित शाह तेच पाढे कधीपर्यंत गिरवणार आहेत? दहा वर्षे झालं फक्त आरक्षण देतो, देतो, हेच सांगितलं जात आहे."

यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता, "मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला शरद पवार-उद्धव ठाकरे तयार आहेत का?" यावर उत्तर देताना जरांगे-पाटील म्हणाले, "शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचं मत ओबीसीतून आरक्षण द्यावं, असं नाही. पण, तुमचं (फडणवीस) काय मत आहे? तुम्हाला (फडणवीस) आरक्षण द्यायचं आहे की नाही? कधीपर्यंत एकमेकांवर मराठा आरक्षणाचा विषय टोलवणार आहात? ओबीसी कोट्यातून देणार आहात की नाही? याबाबत तुमचं (फडणवीस) मत सांगा." या वादानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Post a Comment

0 Comments