प्रेमाला घरच्यांचा विरोध, लग्नावरून वाद प्रेयसीच्या डोक्यात घातला दगड


पालघर |

प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बोईसर मुरबे घडली आहे. हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणार्‍या प्रियकराने आपल्या प्रेयसीची प्रेमसंबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. स्नेहा चौधरी ( वय १९ वर्षे) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून तिची हत्या करून फरार झालेला प्रियकर सुमित नवनीत तांडेल (वय २१ वर्षे) याला सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

स्नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडेल हे मुरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करीत होते. सोमवारी सकाळी नेहमप्रमाणे आठ वाजेच्या सुमारास दोघे ही आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले असताना मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडण सुरू झाले. भांडणादरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून रक्तबंबाळ केले. या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांना दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून सुमित तांडेल हा स्नेहा हिला दुचाकीवर बसवून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परिसरात घेऊन गेला. दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परिसरात शोधमोहीम सुरू केली. 

दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्नेहा चौधरी हिचा मृतदेह खाजन परिसरात सापडला. लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची बँग यावरून तिची ओळख पटविण्यात आली. यानंतर बोईसर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत खून करून पसार झालेला आरोपी सुमित तांडेल याला सातपाटी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर स्नेहा हिचा मृतदेह शविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार हे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments