सोलापूर |
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीला आलेल्या अपयशानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात बरेच बदल केले जाणार आहेत. त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार ही होणार असल्याची चर्चा आहे. सोलापूर आणि माढा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या हातून गेले. त्याला कारणे ही बरीच आहेत. पण या पाच वर्षात सोलापूर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला नाही त्यामुळेही हा फटका बसला म्हणावा लागेल.
आता नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापुरातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सोलापूर लोकसभा लढवलेले आमदार राम सातपुते या दोघांच्या नावाची चर्चा होत आहे. दोन देशमुख यांच्यामधील वाद यामुळे या दोघांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता फारच कमी वर्तवली जात आहे. अजित पवार गटातून करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे हे नाव चर्चेला आले आहे.
माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची इच्छा नसतानाही त्यांना सोलापूर लोकसभा निवडणूक लढवावी लागल्याचे समजते परंतु पक्षाचा आदेश शीरसंवाद मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि सोलापूर लोकसभेच्या इतिहासात पराजित उमेदवाराला सर्वात जास्त मते त्यांनी मिळवली. त्या राम सातपुते यांना मंत्री पदाचे बक्षीस दिले जाणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही आपल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सुमारे दहा हजाराचे मताधिक्य दिले. कल्याणशेट्टी यांचे सर्व राजकीय नेत्यांची असलेले चांगले संबंध पाहता त्यांच्याही गळ्यात मंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. सचिन कल्याण शेट्टी किंवा राम सातपुते यांना मंत्री करून त्यांना पालकमंत्री करण्याचा मनोदय पक्षाचा असल्याचेही आता माहिती मिळत आहे.
0 Comments