लोकसभा निवडणुकीच्या काळात बारामती मतदार संघ हा चांगलाच चर्चेत राहिला आहे. कारण बारामती लोकसभा मतदार संघातपावर विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. मात्र या चुरशीच्या सामन्यात शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे यांचा महाविकास आघाडीकडून दणदणीत विजय झाला आहे. मात्र या सामन्यानंतर अजित पवार गट बॅकफूटवर गेला असल्याचे दिसत आहे.
आता लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीकरांचे लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. बारामतीमधील नागरिकांनी आता अजित पवारांविरोधात आवाज उठण्यास सुरुवात केली आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून बारामती दौऱ्यावर आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे.
अशातच आता युगेंद्र पवार यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. येत्या विधानसभेला बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी पवार साहेबांना कार्यकर्ते म्हणाले की, आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र शरद पवारांची लेकीने म्हणजेच सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना दारुण पराभव केला आहे. त्यामुळे अजित पवार गट बारामतीमध्ये बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसत आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य बारामती शहरातून सुप्रिया सुळे यांना मिळाले होते. त्यामुळे अजित पवार यांना शहरातूनच आव्हान निर्माण झालं आहे का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार याचा अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार आहेत.
0 Comments