राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत अजितदादांच्या आमदारांची भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आता पश्चिम महाराष्ट्राच्या आमदारांचा देखील समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण 30 जागांवर विजय मिळवला. राज्यात महाविकास आघाडीचं पारडं जड दिसलं. यामध्ये अजित पवार गटाच्या आमदारांनी मदत केली असल्याची माहिती समोर आली. तसेच नुकतंच शरद पवारांनी एक वक्तव्य करत गुगली टाकली आहे. ज्या आमदारांनी तसेच काही नेत्यांनी टीका, आरोप केली नाही त्यांच्यासाठी परतीचा विचार केला जाईल, असं शरद पवार म्हणाले.
जयंत पाटील हे विधीमंडळाच्या कामकाजासाठी गेले होते. त्याचवेळी अजित पवार गटाच्या नेत्यांनी आणि चार ते पाच आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि अनिल देशमुख देखील उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकचे दोन आमदार…
चार ते पाच आमदारांपैकी पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकच्या दोन आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीआधी कांद्याचा प्रश्न पेटला होता. त्याचा फटका हा महायुतीला बसला होता. यामुळे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे आता नाशिकचे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे.
यावर आता आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की जयंत पाटील हे मोठे नेते आहेत. कोणतं कार्ड कधी काढायचं असतं हे त्यांना जास्त माहिती आहे. ही केवळ एक सुरूवात आहे. शरद पवार हे महायुतीच्या नेत्यांपेक्षा कितीतरी पुढे आहेत. हे आपण आता लोकसभा निवडणुकीत पाहिलं असेल. यामुळे ज्यांनी उन्माद केला त्यांच्यावर शरद पवार आणि जयंत पाटील निर्णय घेतील, असं रोहित पवार म्हणाले.
“आमदार तितके खुळे नाहीत”
त्यानंतर रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप आता अजितदादांना महायुतीतून जाणूनबुजून बाहेर पाडलं जातंय. अजित पवारांच्या आमदारांना फक्त शरद पवारांच्या आमदारांची मते खाण्यासाठी उभे राहण्याची भूमिका ही भाजपची दिसतेय, असं रोहित पवार म्हणाले आहेत. पण आमदार हे तितके खुळे नाहीत. त्यामुळे ते जर भाजपसोबत राहिले तर अजितदादांना 20 ते 22 जागा मिळतील. जर स्वतंत्र लढले तर त्याठिकाणी त्यांचे आमदार उभे राहतील. पण ते फक्त मतं खाण्यासाठी असतील, त्यांच्यातील कोणीही निवडूण येणार नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
0 Comments