दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने मोठा धक्का दिलाय. सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सध्या केजरीवाल जामिनावर बाहेर आले आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीच्या अटकेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांना जामीन प्राप्त होताच त्यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली होती.
अशात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्याबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी दिलीतील मतदारांना एक महत्वाचा आवाहन केलं. इतकंच नाही तर, यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यावर देखील निशाणा साधला.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा त्यांनी केजरीवाल यांच्यावर प्रचंड टीका केली होती. आज चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू असताना त्यांनी मतदारांना आवाहन केलंय.
“आज देशात लोकशाहीचा मोठा उत्सव सुरू आहे. यामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन चारित्र्यवान आणि प्रामाणिक व्यक्तीला मतदान करावं. देशाची चावी मतदारांच्या हाती आहे. ही चावी योग्य हातात गेली पाहिजे, ती चुकीच्या हाती पडता कामा नये”, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ‘स्वच्छ उमेदवारांना निवडून द्या. ईडीकडून ज्यांची चौकशी सुरू आहे, अशांना निवडून देऊ नका,’ असं म्हणत अण्णा हजारे यांनी अप्रत्यक्षपणे अरविंद केजरीवाल यांना टार्गेट केलं. दारू घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांचं नाव समोर आलं. दारूच्या नशेत असल्यानं त्यांनी हा भ्रष्टाचार केला. असे लोक पुन्हा निवडून यायला नको, असं अण्णा हजारे म्हणाले.
यूपीए सरकारच्या काळात झालेल्या आंदोलनात अण्णा हजारे यांच्यासोबत अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, कुमार विश्वास यांच्यासह अनेक लोक होते. पुढे केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढला आणि अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचे मार्ग वेगळे झाले.
0 Comments