धवलसिंह मोहिते पाटील भाजपच्या गळाला? माढयात देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी



माढा |

माढा मतदारसंघात फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याने कधी काय होणार हे कोणालाच सांगता येत नाही. यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींपासून अलिप्त असणारे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची भेट घेणार आहे. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही भेट धवलसिंह यांच्या घरी होणार आहे. या भेटीनंतर धवलसिंह मोहिते पाटील हे अकलूज मध्ये होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेजवर जाणार असल्याचे बोलले जाते त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश मानला जात असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का आहे.

धवलसिंह हे काँग्रेसला धक्का देत भाजपामध्ये प्रवेश करू शकतात. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे धवलसिंह हे पुत्र आहेत. दरम्यान, चोर समजून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत.

यानंतर तात्पुरते जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्या कार्यकर्त्यांवर देण्याची मागणी झाली. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एडवोकेट नंदकुमार पवार यांना कार्याध्यक्ष पद देऊन जिल्हाध्यक्ष पदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीदेखील ते उपस्थित नव्हते. यामुळे आज ते फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपामध्ये प्रवेश करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

0 Comments