तुळजापूर- सेवेसाठी दिलेल्या तुळजाभवानी देवस्थान जमिनीच्या संदर्भात शर्तभंग प्रकरणी संबंधित जमीन खरेदी-विक्री करणारे व्यक्ती व त्याला मंजुरी देणारे तत्कालीन अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली.
तुळजाभवानी देवस्थानाची जमीन, इनाम, वतन, वक्फ जमिनी सेवेसाठी देण्यात आलेल्या आहेत. काही जणांनी शर्तभंग करून जमिनीची विक्री केली. यामध्ये जमीन विकणारे व घेणारे तसेच परवानगी देणारे तत्कालिन अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तुळजापूर येथील २ हजार ५९६ एकर देवस्थान जमीन, इनाम, वतन, वक्फ जमीन घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे यांनी येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानसह २ हजार ५९६ एकर जमीन घोटाळा प्रकरणी १९६५ पासूनच्या जमिनीवर यापूर्वी देण्यात आलेले अकृषी आदेश रद्द करून कारवाईला सुरुवात केली आहे.
जमिनीचा भोगवटदार वर्ग २ करण्यात आला आहे. आता या जमिनीची खरेदी-विक्री सक्षम अधिकारी यांच्या मंजुरीशिवाय करता येणार नाही. महसूल विभागाने दिलेले अकृषी आदेश रद्द केल्याने तुळजापूर तालुक्यातील भूमाफियात तसेच बांधकाम व्यावसायिकात खळबळ उडाली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या जमीनी सेवेसाठी दिलेल्या आहेत. अनेक धनदांडग्या व राजकीय नेत्यांनी तत्कालीन महसुली अधिका-यांशी संगणमत करून या जमिनी स्वत:च्या नावे करून घेतल्या आहेत. यापैकी काही जमिनीची खरेदी-विक्री झालेली आहे.
तहसीलदार तांदळे यांनी अशा जमिनीच्या सातबारा उता-यावर आता भोगवटदार वर्ग २ ची नोंद केल्याने त्याची खरेदी-विक्री करता येणार नाही. यात अनेक राजकीय नेते, प्रतिष्ठीत यांच्या ताब्यातील जमिनी असून त्यावर टोलेजंग इमारती व अकृषी वापर करण्यात आला आहे. सेवेसाठी दिलेल्या जमिनीच्या शर्तभंग प्रकरणी संबंधित खरेदी-विक्री करणारे व्यक्ती व त्याला मंजुरी देणारे तत्कालीन अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची कारवाई होणार असल्याचे तहसीलदार तांदळे यांनी सांगीतले.
0 Comments