मुंबई |
नेपाळचा अष्टपैलू फलंदाज दिपेंद्र सिंग आयरी याने बुधवारी क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने T20 इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विश्वविक्रम केला होता. यूवराजचा हा विश्वविक्रम दिपेंद्रने अवघ्या ९ चेंडूत अर्धशतक ठोकून मोडला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नेपाळ आणि मंगोलिया यांच्यातील बुधवारी सामना रंगला. हांगझोऊ येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर खेळला गेलेल्या या सामन्यात दिपेंद्र सिंग आयरी याने ९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने १० चेंडूत ५२ धावांची स्फोटक खेळी खेळली. २३ वर्षीय दीपेंद्र सिंग आयरीने नेपाळकडून आतापर्यंत ५२ एकदिवसीय आणि ३९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
मंगोलियाविरुद्ध खेळलेल्या त्याच्या विक्रमी खेळीची खास गोष्ट म्हणजे ५२ धावांच्या या डावात त्याने केवळ षटकारांसह ४८ धावा पूर्ण केल्या. दीपेंद्र सिंगने ८ षटकार ठोकले. त्याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर नेपाळने २० षटकांत ३ गडी गमावून ३१४ धावांची मोठी मजल मारली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील कोणत्याही संघाची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
0 Comments