मुंबई |
राज्यातील राजकारणात वाऱ्याच्या वेगाप्रमाणे घटना घडत आहेत. अशातच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. "राज ठाकरेंचे शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडली, स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, परंतु शिवसेना माझीच असं वक्तव्य त्यांनी कधीच केलं नाही," असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं.
खासदार सुप्रिया सुळे सध्या दौंड आणि इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. इथल्या गणेश मंडळांना भेटी देण्याचा सुप्रिया सुळे यांचा दौरा आहे. त्यांनी दौंड इथे गणपतीची आरती केली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राज ठाकरेंचे कौतुक करते.
त्यांचे जेव्हा पक्षामध्ये मतभेद झाले तेव्हा त्यांनी त्यांची वेगळी चूल मांडली, त्यांनी वेगळा पक्ष म्हणजेच मनसेची स्थापना केली. राज ठाकरेंचे कौतुक करते. त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले असतील. पण शिवसेना माझीच आहे असे वक्तव्य त्यांनी कधीही केले नाही. हे कटकारस्थान दिल्लीतून सुरु आहे. अदृश्य हात याच्या पाठीमागे आहेत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि मराठी माणसांचे घर पक्ष फोडण्याचं पाप सातत्याने होत आहे. यांचे यश भारतीय जनता पक्षाला सहन होत नाही."
0 Comments