विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. आज दुसऱ्या दिवशीही अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात झाली. अशातच या चर्चेदरम्यान राहुल गांधी कधी बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज सभागृहात राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत भाषण केलं. राहुल गांधी अविश्वास ठरावावर बोलत आहेत. राहुल यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. कारण तुमच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केलंय, तोडलंय, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर थेट हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधींनी भाषणाच्या सुरुवातीला आपल्याला लोकसभेत घेतलं याबाबत लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. अन् पहिला वार थेट भाजपवर केला. राहुल गांधी म्हणाले की, "मागील वेळी मी जेव्हा अदानी यांच्यावर बोललो तेव्हा काहींना त्रास झाला. यावेळी मी हृदयापासून, मनापासून बोलणार आहे."
मणिपूरमध्ये मोदी सरकारनं भारताची हत्या केली : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण आमचे पंतप्रधान गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. मणिपूरचे सत्य हेच आहे की, मणिपूर आता उरलेलंच नाही. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केले आहेत. तुटलं आहे मणिपूर. मी रिलीफ कॅम्पमध्ये गेलो आहे, तिथल्या महिलांशी बोललो. एका महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय झालं? ती म्हणाली, माझा लहान मुलगा, एकुलता एक मुलगा होता. त्याला माझ्या डोळ्यांसमोर गोळ्या घालण्यात आल्या. मी रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत पडून राहिले. मग मी घाबरले, मी माझं घर सोडलं. मी विचारलं की, घर सोडताना काहीतरी आणलं असेल. ती म्हणाली की, माझ्याकडे फक्त माझे कपडे आहेत आणि तिच्याजवळचा एक फोटो दाखवत म्हणाली, माझ्याकडे फक्त हीच गोष्ट उरली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, दुसऱ्या एका रिलीफ कॅम्पमध्ये एक महिला माझ्याकडे आली, मी तिला विचारलं, तुझ्यासोबत काय झालं? मी तिला हा प्रश्न विचारताच क्षणार्धात ती थरथरू लागली. तिच्या मनात त्या विदारक आठवणी जाग्या झाल्या आणि ती बेशुद्ध झाली. माझ्यासमोर ती महिला बेशुद्धा झाली. ही दोनच उदाहरणं मी सांगितली आहेत. त्यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे. त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या झाली आहे.
0 Comments