पुणे |
पुण्यात डीआरआयने कारवाई करत ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. डीआरआयने तब्बल १०१ किलो मेथाक्युलोन ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत तब्बल ५०.५६ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
डीआरआयच्या पुणे युनिटने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मेथाक्युलोनचा वापर हा झोपेसाठी आणि संमोहनासाठी केला जात असल्याचं बोललं जात आहे.
डीआरआयच्या प्रादेशिक युनिटने २२ ऑगस्ट रोजी पुण्यात तेलंगणा येथील नंबर प्लेट असलेली गाडी अडवली. या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये क्रिस्टलीय पदार्थाने भरलेले प्लास्टिकचे कंटेनर आढळून आले. याची प्राथमिक चाचणी केली असता हे मेथाक्युलोन असल्याचं समोर आले. या संदर्भात फॉरेन्सिक तपासणी केली जात असल्याचं डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणातील एकूण पाच जणांना अटक केली आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीसी) कायद्या अंतर्गत या सर्वांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अशीच कारवाई करत अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. त्यानंतर आता इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच पुणे शहर आता ड्रग्जच्या विळख्यात अडकत आहे का? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.
0 Comments