पुणे |
पुण्यातील येरवडा भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सावत्र आई आणि वडील हे सतत मानसिक, शारीरिक त्रास देत असायचे. या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सतत टोमणे मारणे तसेच इतर शारीरिक आणि मानसिक त्रास देणे याला ही मुलगी वैतागली होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव अश्विनी चव्हाण वय १७ असे आहे. तर वडील नामदेव तुकाराम चव्हाण आणि सावत्र आई लक्ष्मी नामदेव चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगी अश्विनी चव्हाण हिच्या आईचे निधन झाल्यानंतर आरोपी वडील नामदेव चव्हाण यांनी लक्ष्मी सोबत लग्न केले. त्यानंतर वडील आणि सावत्र आई हे दोघे मयत अश्विनी हिला घरातून बाहेर पडू देत नव्हते. तिला शिक्षण करू देत नव्हते. तसेच तिला मारहाण देखील करीत होते. या सर्व त्रासाला अश्विनी कंटाळली होती.
त्याच दरम्यान सर्व कुटुंबीय गुलबर्गा येथे लग्नासाठी गेले होते. तेथून पुण्याकडे रेल्वेमधून सर्वजण प्रवास करीत होते. दौंडपर्यंत रेल्वे आल्यावर अश्विनी हिने चालत्या रेल्वेमधून उडी मारली. या घटनेत अश्विनी हिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मुलीचे मामा शंकर राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडील नामदेव तुकाराम चव्हाण आणि सावत्र आई लक्ष्मी नामदेव चव्हाण या दोघा आरोपींच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे येरवडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी माहिती दिली.
0 Comments