पुणे – लातूर – पुणे इंटरसिटी रेल्वे लवकरच सुरु होणार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश



धाराशिव |

 पुण्यातून लातूरला जाण्यासाठी बिदर एक्स्प्रेस, नांदेड एक्स्प्रेस आणि हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्या आहेत. यातील दोन गाड्या रात्री आहेत आणि हैदराबाद एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस हडपसर टर्मिनलवरुन सकाळी सुटते. या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे लातूरला जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

त्यामुळे पुणे – लातूर – पुणे ही इंटरसिटी रेल्वे सुरु करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात होती. अखेर ही मागणी मंजूर करण्यात आली असून, लवकरच पुणे – लातूर – पुणे ही इंटरसिटी रेल्वे सुरु होणार आहे. पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठवण्यात आला आहे.


लातूर पुणे या मार्गावरील रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. याच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.लातूरमार्गे जाणाऱ्या गाड्यांना कायम गर्दी असल्यामुळे नागरिकांकडून लातूर विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून केली जात होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे कोच उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरु केली जात नव्हती. आता रेल्वेचे कोच उपलब्ध झाल्यामुळे आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करता पुणे विभागाने लातूरसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही रेल्वे सुरु होण्यासाठी आता मुख्यालयाच्या परवानगीची प्रतिक्षा आहे. मुख्यालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर ही रेल्वे सुरु होणार आहे. पुण्यातून सकाळी सात वाजता ही रेल्वे लातूरसाठी रवाना होणार आहे आणि दुपारी एक वाजता ही रेल्वे लातूरमध्ये दाखल होईल. त्यानंतर पुन्हा दुपारी दोन वाजता हीच रेल्वे लातूरहून पुण्यासाठी रवाना होणार आहे. ही रेल्वे सुरु झाली तर अनेक प्रवाशांना या रेल्वेचा फायदा होणार आहे. त्यासोबतच पुणे-लातूर रेल्वे सेवा सुरु झाल्यास सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पुणे – लातूर – पुणे ही इंटरसिटी रेल्वे सुरु करावी, या मागणीचे पत्र खा. ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याला दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अखेर पुणे – लातूर – पुणे ही इंटरसिटी रेल्वे सुरु होणार असल्याने पुण्याहून धाराशिवला आणि धाराशिवहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाश्याची मोठी सोय होणार आहे.

Post a Comment

0 Comments