नाशिक |
जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या लखमापूर येथील सहा वर्षांच्या चिमुरडीचा उकळत्या तेलाच्या कढईत पडून भाजल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी चिमुकली उकळत्या तेलाच्या कढईत पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर चिमुकलीची मृत्यूसोबत सुरू असलेली अनेक दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरु असतानाच तिची प्राणज्योत मालवली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहराजवळील लखमापूर येथील चिमुरडी कुटुंबासमवेत राहत होती. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरी स्वयंपाक करण्याचे काम सुरु होते. याच वेळी मोठ्या कढईत शेव काढण्याचे कामही सुरू होते. चिमुरडी उकळत्या तेलाच्या कढईत पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने लखमापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. लखमापूर रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान या खाजगी रुग्णालयात काही दिवस उपचार केल्यानंतर तिला नाशिकमधील आज आडगाव भागात असलेल्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना १३ मार्च रोजी तिचे निधन झाले. तब्बल वीस दिवसांची तिची झुंज अयशस्वी ठरली. सहा वर्षाच्या चिमुकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सटाणा पोलिसांत शनिवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments