धाराशिव |
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जाता -जाता उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले होते. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकराने त्यात थोडासा बदल करून उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले होते. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात नामांतरास हरकत घेणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.धाराशिव नामांतर विरोधी याचिका शेख मसूद व इतर १९ आणि खलील सय्यद यांनी दाखल केली आहे.
या याचिकेची सुनावणी २० एप्रिल रोजी झाली . यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. प्रज्ञा तळेकर यांनी न्यायालयात सांगितले की, फक्त उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. तालुका आणि जिल्हा उस्मानाबाद असेच आहे, तरीही महसूल आणि इतर विभागाचे अधिकारी आपल्या कामकाजात तालुका आणि जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद लिहीत आहेत. त्यावर न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत तालुका आणि जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद असेच लिहावे , असे निर्देश दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी, एक आदेश काढून महसूल आणि इतर कार्यालयांनी पुढील आदेश येईपर्यंत तालुका आणि जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद असेच लिहावे, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अमंलबजावणी करावी, असेही सूचित केले आहे.
उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले. या नामांतरास न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. मात्र पुढील आदेश येईपर्यंत तालुका आणि जिल्ह्याचे नाव धाराशिव लिहिण्यास प्रतिबंध केला आहे. मात्र याचिकाकर्ते मसूद शेख आणि खलील सय्यद यांनी याबाबत समाधान व्यक्त करीत नामांतरास ही एक प्रकारची स्थगिती असल्याचे म्हटले आहे.
0 Comments