भूम |
मानसिक, कौटुंबिक त्रासाला कंटाळेल्या बापाने मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना येरमाळा शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या खूनप्रकरणी येरमाळा पोलिसांनी बापाला अटक केली असून, पोलिसांच्या माहितीनुसार, सतीश महादेव बारकूल (५५) यांचा मुलगा रामराजे (२३) हा सतत मानसिक व कौटुंबिक त्रास देत होता.बुधवारी रात्री तो दारु पिऊन घरी आल्यावर बाप-लेकामध्ये कुरबुर झाली. मुलगा रामराजेने वडिलांसह आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर तो शेतात निघून गेला, वडील सतीश बारकुल हे रामराजे याच्या त्रासाला कंटाळून गेले होते.त्यातून त्यांनी मुलगा रामराजे यास मारण्याच्या उद्देशाने गुरूवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कळंब रोडवरील शेतातील गोठ्यामध्ये झोपलेला असताना डोक्यात दगड घातले.यात रामराजे याचा जागीच मृत्यू झाला.
सतीश बारकुल यांनी त्यांचा लहान भाऊ लालासाहेब महादेव बारकुल यास मुलाचा अंत्यविधी झाल्यानंतर खून केल्याचे सांगितले. लालासाहेब बारकुल यांच्या फिर्यादीवरुन येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरूवारी सायंकाळी सुरू होती. बापानेच मुलाचा खून केल्यामुळे येरमाळ्यात चर्चांना उधाण आले असून, नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सतीश बारकुल यांना अटक केली आहे.
0 Comments