पुणे |
राज्यात होळी आणि धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले आहे. याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच मोरे यांनी लवकरात लवकर ३० लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली आहे. ऐन होळीच्या दिवशी अशी घटना घडल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.
वसंत मोरे यांच्या मुलाला मिळालेल्या धमकीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेंचं वातावरण आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याचे बनावट विवाह सर्टिफिकेट तयार करण्यात आले आहे. या सर्टिफिकेटचा गैरवापर केला जाईल. तुम्ही ३० लाख रुपये द्या अन्यथा योगेश मोरे यांना गोळ्या घालून ठार करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करून रुपेश मोरे यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसात या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात होळीचा उत्साह असतानाच वसंत मोरे यांच्या मुलाला अशी धमकी आली आहे. या धमकीमागे नेमकं कोण आहे? होळीनिमित्त कुणी खोडसाळपणा केला आहे की खरच अशा प्रकारे खोटे विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले आहे, की राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडलाय, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतलं मोठं आणि नेहमीच चर्चेत असलेलं नाव म्हणजे वसंत मोरे. पुण्यातील ते अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक आहेत. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक, निष्ठावंत आणि अत्यंत जवळचे नेते मानले जातात. पुण्यात कात्रज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. तर शाहू मंदिरातून त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. वसंत मोरे हे व्यावसायिक आणि शेतकरी आहेत. ते आधी शिवसेनेत होते. मात्र मागील २७ वर्षांपासून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहेत. शिवसेनेपासून मनसे वेगळी झाली, तेव्हापासून ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत.
0 Comments