सोलापूर |
जेव्हा आपणास मंत्रिमंडळातून डावलण्यात आले तेव्हा संतापाने सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने धाराशिव जिल्हा परिषदेत मातोश्रीचा आदेश डावलून बंडाचा झेंडा फडकावला. त्यानंतर दोन वर्षांत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत दीडशेवर बैठका होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवण्यात आल्याचा बॉम्बगोळा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी टाकल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत परंडा येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.
परंडा येथे आयोजित भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धे दरम्यान आयोजित कार्यक्रमात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हा राजकीय गौप्यस्फोट करून सत्तांतर नाट्यामागच्या सस्पेन्स उघड केला आहे. ठाकरे सरकार सत्तेत येण्यापूर्वी राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत हे कॅबिनेट मंत्री होते. जेव्हा सन २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. निवडणुकीत भाजप- सेनेची युती होती.
मात्र निवडणूक निकालानंतर ही युती तुटली आणि दोन्ही काँग्रेसच्या सहकार्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उध्दव ठाकरे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. मंत्री सावंत यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले. तेव्हा त्याठिकाणी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आरपीआयचे सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर, अनिल खोचरे, गौतम लटके, रत्नकांत शिंदे, सुरेश डाकवाले आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असताना शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही आपल्याला स्थान दिले नाही.
त्यामुळे 'मातोश्री'वर जाऊन 'त्यांना' सांगून आलो की मी आता पुन्हा या 'मातोश्री'ची पायरी चढणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. पहिली बंडखोरी यशस्वी झाल्यानंतर सावंत ठाकरे सरकार पाडण्यासाठी कामाला लागले. सलग दोन वर्षे त्यांनी आमदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना समजावून सांगत त्यांचे मतपरिवर्तन केले. याकाळात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास १०० ते १५० बैठका झाल्या. त्यानंतर सुरत, गुवाहाटी मार्गे ते सरकार पाडले, असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी यावेळी केला. ठाकरे सरकार पाडण्यात भाजपचा काहीही संबंध नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी वारंवार सांगितले आहे. मात्र तानाजी सावंत यांच्या गौप्यस्फोटाने फडणवीस यांनाही खोटे पाडले आहे. ठाकरे सरकार पाडण्याचे कटकारस्थान दोन वर्षांपासून शिजत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. इतकेच नव्हे तर फडणवीस यांच्या आदेशानेच हे घडत होते, असे सांगत मंत्री सावंत यांनी खळबळ उडवून दिली आहे
0 Comments