बार्शी |
बार्शी तालुक्यातील सुर्डी गावामध्ये गटशेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. विजेता शेतकरी तूर उत्पादक गटाने हि किमया साधली आहे, पाणी फाउंडेशन च्या माध्यमातूनही सुर्डी गावाने किमया केली आहे. सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सुर्डीने सहभाग नोंदवला. तूर, उडीद व सोयाबीन हे तीन गट केले आणि यामध्ये सुमारे १०० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. परंतु पाऊस वेळेवर न आल्याने उडीद आणि सोयाबीन हे गट मोडले. मात्र तूर हा गट अबाधित राहिला.
२२ शेतकऱ्यांनी एकत्र येत २९ एकर क्षेत्रावर तूर हे पीक केले. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तूर हे पीक विषमुक्त व्हावे यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पाणी फाउंडेशन टीमने तुरीचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. आज अखेर सुर्डीच्या तुरीचा विषमुक्त रिपोर्ट आलेला आहे. ६-७ एकर तूर पाण्याने वाया जाऊनही जवळपास अडीचशे क्विंटल तूर गटाला झाली आणि गटाला सरासरी ११ क्विंटल प्रति एकर उतार मिळाला.
आज याच तुरीला नऊ हजार रुपयांनी मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटाने शेती केल्याने उत्पादन खर्चात घट तर झालीच परंतु गटातील प्रत्येक शेतकरी लखपती झाले. गटाची ही कामगिरी पाहून आज अनेकांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत व कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु यापेक्षा अन्नधान्य विषमुक्त आणि शेतकरी लखपती बनण्याकडे सुर्डीचा प्रवास सुरू झालेला आहे हे मात्र नक्की. 'विजेता' तूर उत्पादक शेतकरी गट आणि टीम पाणी फाउंडेशन सुर्डी हि किमया साधली आहे.
0 Comments