सोलापूर |
ज्याला आपल्या आयुष्यात काही करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कसे जगले, कसे वागले, त्यांनी केलेले पराक्रम ही गोष्ट आपल्या लेकरांमध्ये मुरवणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी नुसत्या मिरवणुकीची नाही तर व्याख्यानाची गरज आहे. मिरवणुकीत आम्ही फक्त फोटो मिरवतो आणि आपण नाचतो. नाचून - नाचून शिवाजी महाराज कळणार नाहीत तर वाचून - वाचूनच शिवाजी महाराज कळतील, असे विचार बार्शी तालुक्यातील पांगरी येथील प्रा. विशाल गरड यांनी मांडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गवळी वस्ती तालीम संघाच्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेतील " स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज " या विषयावर पहिले पुष्प गुंफताना गुरुवारी सायंकाळी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे शेतकऱ्यांना कळले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांप्रती काय होते हे लेकरांना कळले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यावरणवादी दृष्टिकोन कसा होता हेही समाजाला कळले पाहिजे. महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देव्हार्यातील देवता असे संबोधले आहे. जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना मांडली
जिजाऊंना चाकरी मान्य नव्हती आपल्या मुलांना आपण स्वतः उभं करायचं अशी खूनगाठच त्यांनी मनाशी बाळगली होती आणि छत्रपतींना त्यांनी उभे केले. जिजाऊंनी छत्रपतींवर संस्कार केले म्हणून आज स्वराज्य निर्माण झालं. उत्सवात अनावश्यक खर्च करण्यापेक्षा गरीब घरातील मुलाच्या शिक्षणावर खर्च करा तेच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना ठरेल. नुसता धांगडधिंगा करून उपयोग नाही तर छत्रपतींच्या विचारांचा उत्सव झाला पाहिजे. त्यासाठीच सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. खंबीर मावळ्यांच्या जोरावर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते कर्तुत्व आहे. आजच्या तरुणांना खरे शिवचरित्र कळायचे असेल तर फक्त शिवचरित्र वाचू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना सुद्धा तुम्हाला वाचावी लागेल.
छत्रपतींचा विचार डोक्यात घेतल्यानंतरच प्रेम व्यक्त करता आले पाहिजे.हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी हजारो मावळ्यांनी रक्ताची रंगपंचमी खेळली. शेकडो गडकोट किल्ल्यांवर रक्ताचा अभिषेक चढविला. कित्येक आया बहिणींनी स्वतःचे कुंकू वाहिले तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले आहे आणि याच हिंदवी स्वराज्याच्या देण्यापोटी आपणही याच मातीत जन्माला आलो. ज्या छाताडावर आपण शिवाजी महाराजांचा बिल्ला लावतो, त्या छाताडाच्या दोन इंचात आतमध्ये हृदय आहे. आणि या हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवा. शंभर टक्के इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले, असेही प्रा. विशाल गरड म्हणाले.
येणारा काळ हा स्त्रियांचा आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गोळा आपल्या पोटात निर्माण केला. स्त्री जन्माचे स्वागत करा,पराक्रमी, बुद्धीवान आणि ताकदवान व्हा असा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असल्याचे प्रा. गरड यांनी सांगितले.
यावेळी गवळी वस्ती तालीम संघांचे अध्यक्ष महादेव गवळी, उत्सव अध्यक्ष शेखर कवठेकर, हेमंत पिंगळे, चंद्रकांत पवार यांच्यासह श्रोते उपस्थित होते. शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील प्रा. डॉ. रामभाऊ मुटकुळे हे " साहित्यातील संभाजीराजे आणि वास्तव इतिहास " या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत.
0 Comments