बार्शी |
बार्शी तालुक्यातील पांगरी येथे बेकायदेशीरपणे चालणा-या फटाके कारखान्यातील स्फोट व चार महिला कामगारांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारखाना मालक व भागीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. फरार असलेल्या दोघांपैकी कारखाना मालकास मंगळवारी सकाळी शिराळे शिवारातील ज्वारीच्या पिकातून पांगरी पोलिसांनी अटक केली.
युसुफ हाजी मणियार (रा.पांगरी ता.बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या कारखाना मालकाचे नाव असून भागीदार नाना पाटेकर (रा.उस्मानाबाद) हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कामगीरी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलिस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी पोलीस पथकाचे प्रमुख सपोनी नागनाथ खुने, सहाय्यक फौजदार सतिश कोठावळे, सुनील बोदमवाद, अर्जुन कापसे, संतोष कोळी यांच्या पथकाने केली.
रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पांगरी-शिराळे रस्त्यावरील इंडीयन फायर वर्क्स या फटाके निर्मितीच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन चार महिला कामगारांचा मृत्यु झाला होता. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास पांगरी येथील त्या दुर्घटनाग्रस्त फटाके कारखान्यास भेट दिली होती. तसेच तीन पथके तयार केली होती.
0 Comments