सोलापूर |
बाळे येथील श्री येडेश्वरी क्रीडांगणावर पार पडलेल्या ‘ओंकार चषक क्रिकेट लिग 2022’ स्पर्धेचे विजेतेपद ओंकार ए संघाने पटकाविले. तर ओंकार डी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दिलीप थोरात हा मालिकावीर ठरला.
स्पर्धेचा अंतिम सामना ओंकार ए विरूद्ध ओंकार डी संघात झाला. नाणेफेक जिंकून ओंकार ए संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना ओंकार डी संघाने निर्धारित आठ षटकात 7 बाद 80 धावा केल्या. यात सोमनाथ (अप्रि) तडकल याच्या 22, समाधान नीळ व आरिफ शेख यांच्या प्रत्येकी 15 धावांचा समावेश होता. ओंकार ए संघाकडून दिलीप थोरात व नितीन ठाकरे यांनी प्रत्येकी दोन तर नागेश कोकरे व आण्णा वारशेट्टी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या ओंकार ए संघाने हे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 5.4 षटकात 82 धावा करीत सहज पार केले. आठ गडी राखून विजय नोंदवत स्पर्धेची चॅम्पियनशिप पटकाविली. दिलीप थोरात याने 16 चेंडूत 43 तर अमोल सावंत याने 11 चेंडूत 20 धावांची धडाकेबाज खेळी केली. दिलीप थोरात हा सामनावीर ठरला.
विजेत्या संघात कर्णधार नितीन ठाकरे, किरण डांगे, दिलीप थोरात, आण्णा वारशेट्टी, भाऊसाहेब कसबे, नागेश गुळवे, नागेश कोकरे, अमोल सावंत, सोन्याबापू भोसले, सुनील शिंदे, गणेश सरवले, प्रवीण माने, दीपक जाधव, अभिजीत भोसले यांचा सहभाग होता.
तत्पूर्वी, स्पर्धेत झालेल्या एका सामन्यात शिवाजी पवार याच्या 8 षटकार व 10 चौकारांच्या जोरावर 37 चेंडूत 104 धावांच्या तुफानी खेळीने सर्वांची वाहवा मिळविली. इतर सामन्यात संदिप सावंत, दिलीप थोरात व रोहन ढेपे यांनी अर्धशतकी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नागेश कोकरे, शिवाजी पवार, दिलीप थोरात, प्रशांत पुजारी हे विविध सामन्यांचे सामनावीर ठरले. मालिकावीरचा किताब दिलीप थोरात याने पटाकाविला. नागेश कोकरे (पाच विकेट) उत्कृष्ट गोलंदाज तर, शिवाजी पवार (163 धावा) उत्कृष्ट फलंदाज ठरला.
0 Comments