यंदाच्या लग्नसराईत वाजणार 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' गाणे



  लग्नसराई म्हटलं की लगीनगीतांशिवाय शोभा येतच नाही. लगीनगीतांचा पॅटर्न हा हळदीचा, वरातीच्या गाण्यांचा असला तरी माहेरहुन सासरी जाणाऱ्या मुलीसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांची होणारी घुटमळ प्रेक्षकांचा दिलाचा ठोका चुकवायला 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' या गाण्यातून समोर आली आहे. 'बकुळा' या गाण्यात लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, वडील आणि भावाच्या मनातील घुटमळ याचे उत्तम वर्णन या गाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे. 

डॉ. विनायक पवार यांनी लिहिलेल्या या गीताला नंदेश उमप, प्रियांका बर्वे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी आपल्या मधुर स्वरांनी चारचाँद लावले आहेत. तर हे गाणे ओंकारस्वरूप बागडे आणि वैभव शिरोळे यांनी संगीतबद्ध केले आहे. 'बकुळा' या गाणयातून अलवार नाते गोंजारले जात असून नंदेश उमप यांनी अगदी जीव ओतून हे गाणे स्वरबद्ध केले आहे यांत शंकाच नाही. हृदयस्पर्शी असे या गीताचे बोल सर्वसामान्य माणसांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून 'बकुळा' या गाण्याला नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळेल यांत शंका नाही. 

'चित्राक्ष फिल्म्स' आणि स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' या आशयघन चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments