महाराष्ट्रात जेव्हा राजकीय बंडखोरी झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या राजकीय घटनेची नोंद फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्ये ही घेण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गुगलवर इतर देशांतून लोकं सर्च करायला लागले. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
बिहारच्या राजकारणात पुढील २४ तासात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने मंगळवारी सर्व खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे राजदने उद्या आपल्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. इतकेच नाही तर काँग्रेसने आपल्या आमदारांना पाटण्यात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. जीतन राम मांझी यांनी आपल्या पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे. नितीश कुमार हे भाजपसोबतची युती तोडून राजद सोबत सत्ता स्थापन करु शकतात. नितीश कुमार राजद, काँग्रेस आणि डाव्यांसह नवीन सरकार बनवू शकतात.
येत्या 24 तासात बिहारच्या राजकारणाची नवी दिशा ठरवली जाऊ शकते, तर दुसरीकडे एनडीएसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. नितीश कुमार ज्या प्रकारे भाजपपासून सतत दुरावले आहेत, त्यावरून नितीश कुमार यांनी मोठे पाऊल उचलण्याचे ठरवल्याचे स्पष्ट होत आहे. नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 11 ऑगस्टपर्यंत ते सोनिया गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप काहीही ठरलेले नाही.
बिहारमध्ये सर्व पक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि पुढील रणनीती ठरवण्यात व्यस्त आहेत. भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या स्थितीत आहे. पण 2025 पर्यंत सरकार पूर्णपणे स्थिर आहे. असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. एनडीए 2024 च्या लोकसभा आणि 2025 च्या विधानसभा निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवेल असं देखील ते म्हणत आहेत.
जेडीयू भाजपपासून फारकत घेत नाही तोच पक्षाचे नेते नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचा सर्वात मोठा चेहरा सांगू लागला आहे. जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस अली अश्रफ फातमी म्हणाले, देशात पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार यांच्यापेक्षा मोठा नेता नाही.
0 Comments