लेखा आणि कोषागारे संचालनालयाकडून गट क संवर्गातील १७० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र राज्यातील लाखो युवक बेरोजगार असताना शासनाने कंत्राटी पद्धतीने भरती न करता परीक्षा घेऊनच भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
लेखा आणि कोषागारे संचालनालयाच्या विविध कार्यालयाअंतर्गत गट क संवर्गाच्या २ हजार ७१४ मंजूर पदांपैकी ७२८ पदे रिक्त आहेत. त्यापैकी सरळसेवेची ३९२ पदे रिक्त असून ७० टक्के पदे कंत्राटी पद्धतीने भरणे शक्य आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाजाच्या आवश्यकतेनुसार १७० पदे कं त्राटी तत्त्वावर दोन वर्षांसाठी भरण्याचा प्रस्ताव लेखा आणि कोषागारे संचालनालयाचे संचालक ज. र. मेनन यांनी वित्त विभागाला दिला आहे. या पदांच्या नेमणुकीची कार्यवाही शासन निर्णयातील अटी-शर्तींचे पालन करून विभागीय सहसंचालक स्तरावरून करण्यात येईल, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज, संगणक प्रणाली
बारामती : राज्याच्या कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांच्या लाभासाठी एकाच अर्जाची संकल्पना आणली आहे. त्यामध्ये अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. पोर्टलवर ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठीही अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेद्वारे लाभार्थींना सोयाबिन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादींची बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून, त्यासाठी १५ मेपर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे.
0 Comments