परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.
राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे. “माझे अश्लील व्हिडीओ केले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल करत नाहीत. माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त तपास सुरू असल्याचे सांगतात. शरद पवार यांच्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात” असा दावा पीडितेने केला.
“आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार… तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह पत्रकार परिषद” अशी फेसबुक पोस्ट लिहून तृप्ती देसाई यांनी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती
यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. तर त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली.
दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघा मंत्र्यांवरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं
0 Comments