"जयसिंगपूर कॉलेज माजी विद्यार्थी अल्युमिनी असोसिएशन' या नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघटनेचा पहिला स्नेहमेळावा जल्लोषात संपन्न"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :


जयसिंगपूर कॉलेजमध्ये 'जयसिंगपूर कॉलेज माजी विद्यार्थी अल्युमिनी असोसिएशन'या नोंदणीकृत संघटनेची बैठक व स्नेहमेळावा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या मेळाव्यास प्रचंड संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
      

कॉलेजची माजी विद्यार्थी संघटना ऑगस्ट २०२० पर्यंत नोंदणीकृत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे बैठका व कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थित रित्या करता येत नसे.परंतु जयसिंगपूर कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेची नोंदणी ऑगस्ट २०२० या वर्षी करण्यात आली.नोंदणी दिवसापासून आज तागायत या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
       
मात्र माजी विद्यार्थी संघटनेची नोंदणी झाल्यापासून या नोंदणीकृत संघटनेच्या झेंड्याखाली जयसिंगपूर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक घेऊन सातत्याने कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या हितार्थ, कल्याणासाठी तसेच समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने रविवार दि. १४ मार्च २०२१रोजी या संघटनेची प्रथम बैठक व स्नेहमेळावाचे आयोजन करण्यात आले होते.
     

 सुरुवातीस या संघटनेचे अध्यक्ष माजी विद्यार्थी व भूगोल विभाग प्रमुख प्रो.डॉ. ए.ए.पुजारी यांनी या संघटनेच्यावतीने आई वृद्धाश्रमास अन्नधान्य दान करण्यात आले.त्यानंतर उपस्थित असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनोभावे स्वागत करून या संघटनेच्या मेळावाच्या आयोजनाबाबतचा आपला उदात्त हेतू  त्यांनी स्पष्ट केला. या दरम्यान त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेकडून केलेल्या रचनात्मक  कामगिरीचा उल्लेख करीत यामध्ये  माजी विद्यार्थी संघटनेने रसायनशास्त्राच्या जळीत  प्रयोगशाळेला नवसंजीवनी देण्यासाठी लाखो रुपयांची देणगी देण्यात आली.  त्याच बरोबर या संघटनेकडून पर्सनल वेइंग मशीन (वजन काटा), कोरोनाच्या काळात माजी विद्यार्थ्यांनी दिलेले सॅनिटायझर  स्टँड,सॅनिटायझर व मास्क देऊन उत्कृष्ट कार्य केले आहे. विद्यार्थी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे थर्मल तपासणी व ऑक्सिजन पातळी मोजणे, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर व NSSच्या यांच्या सहकार्याने राष्ट्रीय जंत मोहिमेच्या माध्यमातून हजारो जंत गोळ्यांचे वाटप करण्यात आले. गरीब होतकरू मुलांना शिष्यवृत्त्या देण्यात आल्या असून अप्रत्यक्ष त्यांना आर्थिक मदत केली जात आहे. तसेच दिवंगत झालेल्या प्राध्यापकांच्या स्मरणार्थ इंग्रजी व  जीवशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये १ हजारची रक्कम देण्यात येणार आहे. तसेच काही आदर्शवत सकारात्मक कार्यक्रम असून त्याचाही उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रत्येक माजी विद्यार्थी या संघटनेचा धागा बनला पाहिजे असा सूतोवाच  त्यांनी केला.
    
  यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी माजी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करताना म्हणाले की,जयसिंगपूर कॉलेज माजी विद्यार्थी संघटना ही शिरोळ तालुक्याची सामाजिक,कला, क्रीडा ,शैक्षणिक व सांस्कृतिक व लोकशाही बळकट करणारी राजकीय विचारांची देवाण-घेवाण करणारी लोकचळवळ रुपी संस्था बनली पाहिजे. त्याचबरोबर या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रीत खूप कार्यक्रम होताना दिसत असून या पुढेही मानवतेला व समाजाला आधार देणारी एक सामाजिक संस्था बनली पाहिजे. माजी विद्यार्थ्यांनी फक्त माजी विद्यार्थी आहोत असे न समजता या कॉलेज व संघटनारूपी कुटुंबाचे आपण अविभाज्य घटक बनले पाहिजे. आपण माजी विद्यार्थी म्हणून  एक क्रियाशील घटक असून  ज्या विषयांमध्ये आपण  पारंगत आहात किंवा ज्या कला आपणांस अवगत आहेत अशा कलांचा वापर करून संघटनेच्या झेंड्याखाली विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे  व स्पर्धेचे आयोजन कॉलेज परिसरात घेण्याबाबत ही त्यांनी माजी विद्यार्थ्यांना उदबोधित केले. माजी विद्यार्थी संघटना ही वटवृक्षाप्रमाणे अमर असते  त्यातील प्रत्येक पारंबी  ही  त्या वटवृक्षाला आधार देत असते  आपणही भविष्यात अशाप्रकारे कार्य करावे अशी अपेक्षा यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी कॉलेजच्या चौफेर प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडून त्याचा लाभ माजी विद्यार्थ्यांनी घ्यावा अशा प्रकारच्या सूचना वजा मार्गदर्शन केले महापूर व कोरोनाच्या काळात कॉलेजने दिलेली विविध स्वरूपातील मदत व केरळ आपत्ती काळात प्रत्यक्षपणे जाऊन केलेली मदत याचा ही उल्लेख त्यांनी केला. सरतेशेवटी या संघटनेच्या उत्कर्षासाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा देऊ केल्या.
    
  
यानंतर माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष उद्योगपती कनकभाई शहा यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत संघटनेच्या विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना घेऊन येण्याबाबत ही मार्गदर्शन केले. या संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी यथोचित माहिती दिली. त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनने गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून कार्य करावे.
      यानंतर उपस्थित असणारे माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतील सुखद अनुभवांच्या आठवणींना उजाळा देत वातावरण अगदी उत्साही व प्रफुल्लित केले या विद्यार्थ्यांनी  संघटनेसाठी काम करण्याची तयारीही दर्शवली. यावेळी  स्वप्निल कांबळे,अभिजीत भांदीगरे, डेबॉन्स ग्रुप, अनुप बजाज, माधुरी पाटील,अरविंद जाधव,कु.कलकुटगी, उदय तेली व कु.श्रद्धा माळी  या माजी विद्यार्थ्यांनी आपली भावनिक मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी भावनेचा बांध फुटणाऱ्या वातावरणाची निर्मिती झाली होती. काही गोड व कटू प्रसंग या निमित्ताने अनुभवायला मिळाली.
        

यानंतर या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. बाळगोंडा पाटील यांनी केले.तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. डॉ.प्रभाकर माने यांनी केले.यावेळी त्यांनी संघटनेचा अनुभव व्यक्त करताना  ते म्हणाले की ,रचनात्मक कामातूनच सामाजिक बदलाची नांदी होत असते ती नांदी आपणास अपेक्षित असून यासाठी आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी या संघटनेच्या बॅनरखाली एकत्रित येऊन सुरुवात करणे आवश्यक आहे अशा प्रकारचा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
      
या कार्यक्रमास कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व सदस्य अशोक शिरगुप्पे जिनेन्द्र दत्तवाडे मामा, प्रा.अभिजीत अडदंडे व बिपिन खाडे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी खजिनदार डॉ.महावीर बुरसे, तसेच सदस्य ए.बी.कांबळे व सुनील कोळी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. हा स्नेहमेळावा यशस्वीपणे व जल्लोषात संपन्न करण्यासाठी प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार, NAAC प्रमुख डॉ. एस.आर.साबळे, संजय चावरे यांनी  संघटना स्थापन करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. तसेच कॉलेजच्या सर्व शाखेचे उपप्राचार्य, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व ज्युनिअर  व सीनियर कॉलेजचे प्राध्यापक, कार्यालयीन अधिक्षक, प्रशासकीय सेवक, कर्मचारी व कॉलेजमधील सर्व माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे  सहकार्य लाभले या सर्व घटकांमुळे हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला हे प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व अप्रत्यक्षपणे अन्य घटकांनीही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप महत्त्वाची मदत केली. पुढील माजी विद्यार्थी संघटनेचा स्नेह मेळावा एप्रिल महिन्यात आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
       सरतेशेवटी उपस्थित असणारे सर्व माजी विद्यार्थ्यांकडून नोंदणीकृत  संघटनेचे मनस्वी कौतुक केले.या  स्नेहमेळावाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. संघटनेच्या विस्तारीकरणास मदत करण्याबाबतचा सूतोवाचही त्यांनी केला.

Post a Comment

0 Comments